योगगुरु रामदेव बाबांना अॅलोपेथी विरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता बळावली आहे. रामदेव यांनी वैद्यकीय शाखा असलेल्या अॅलोपेथीविरोधात वक्तव्य केले होते. यानंतर रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातील वाद शमण्याची चिन्हं दिसत नाहीत.
अॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर टीकेचा भडीमार केल्यानं आयएमएने आक्षेप नोंदवत योगगुरु रामदेव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आयएमएनं आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिले आहे.
योगगुरु रामदेव यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे."योगगुरु रामदेव यांच्याकडून लसीकरणाबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. हे कुठेतरी थांबायला हवं. एका व्हिडिओत त्यांनी १० हजार डॉक्टर आणि १ लाख लोक करोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेऊन मृत पावल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करावा", अशी मागणी आयएमएनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पत्रात केली आहे.