लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या नऊ महिन्यांपासून भारत आणि चीन दरम्यानचा तणाव अधिकच वाढला आहे. चीनच्या कुरापती सुरूच असल्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. २०२० मध्ये पिपल्स लिबरेशन आर्मीने भारत आणि चीनयांच्या मधील तणाव कमी करण्यासाठी करार केला होता. परंतु चीनने या कराराचा भंग करत पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लष्कराची जमावजमव केली आहे.
चीनी सैन्याने २१ सप्टेंबर २०२० रोजी चर्चेच्या सहाव्या फेरीनंतर संयुक्त निवेदन जारी केलं होतं. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्यबळ न वाढवण्याचा आणि कुणाच्याही भूमीवर कब्जा न करण्याचं या निवेदनाद्वारे जारी करण्यात आलं होतं. यावेळी भारत आणि चीनने एकमेकांचा विश्वास घात न करता कराराचं पालन करण्याचाही निर्णय घेतला होता. आता चार महिने उलटत नाही तोच त्या निवेदनाच्या उलट भूमिका घेत चीनने पूर्व लडाखमध्ये सैन्याची जुळवाजुळव केली आहे. चीनच्या या कुरापतीमुळे भारतासमोरही कोणताच पर्याय उरला नाही.
दोन्हीकडून पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर शस्त्रांनी सज्ज जवानांची तैनाती करण्यात आली आहे. भारताने आर्टिलरी गन, टँक, शस्त्रसज्ज वाहने सीमेवर तैनात करण्यात आली आहेत. गेल्यावर्षी पँगाँग खोऱ्यात दोन्ही सैन्यांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. पँगाँगवर ताबा मिळवण्याचा चीनचा प्रयत्न होता. त्यामुळे दोन्ही देशातील सैनिक भिडले होते.