सौदी अरेबियाकडून भारताला होणाऱ्या तेल पुरवठ्यात फेब्रुवारी महिन्यात ४२ टक्क्यांची घट झाली असून, भारताला खनिज तेलाची निर्यात करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून अमेरिकेने स्थान मिळविले आहे.
पारंपरिक पुरवठादार 'ओपेक' राष्ट्रांकडून झालेली उत्पादन कपात, पाहता तुलनेने किफायती अमेरिकी तेलाकडे भारतातील तेल कंपन्यांनी मोहरा वळविल्याचे गेल्या महिन्याची उपलब्ध आकडेवारी दर्शविते.
फेब्रुवारीमध्ये भारताने अमेरिकेकडून प्रति दिन ५,४५,३०० पिंप या प्रमाणात तेलाची आयात केली. महिन्यातील एकूण तेल आयातीत याचे प्रमाण विक्रमी ४८ टक्के इतके असून, आधीच्या जानेवारी महिन्यातील १४ टक्केच्या तुलनेत ते लक्षणीय प्रमाणात वाढले असल्याचे एका वृत्तसंस्थेची आकडेवारी दर्शविते.
त्या उलट, सौदी अरेबियाकडून भारताला होणाऱ्या तेल पुरवठ्यात फेब्रुवारी महिन्यात ४२ टक्क्यांची घट झाली असून, भारतीय तेल कंपन्यांकडून होणारी आयात ४,४५,२०० पिंप प्रति दिन अशी दशकातील नीचांक गाठणारी राहिली आहे. याच महिन्यात सौदी अरेबिया तेलाच्या साठ्यांवरती मिसाईल हल्ला झाला होता. त्याच प्रमाणे २०१९ मध्ये सौदी अरेबियामधील एका तेलाच्या खाणीवर तर तेल प्रोसेसिंग फैसिलीटी मध्ये हल्ला करण्यात आला होता. या सर्व कारणामुळेच सौदी अरेबियाच्या तेलाच्या किमती वाढलेल्या दिसून येत आहेत. अर्थात भारताला तेल पुरवठ्यात सौदी अरेबियाने जे गमावले ते अमेरिकेने कमावले, असे या आकडेवारीतून स्पष्ट होते.