भारत-चीनदरम्यानचा सीमावाद अद्यापही धगधगता आहे. उभय देशांमध्ये यासंदर्भात चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. सीमावादप्रकरणी भारत-चीन चर्चेची दहावी फेरी काल (शनिवारी) पार पडली. चीनी बाजूनं असणाऱ्या सीमेवरील माल्डो याठिकाणी कॉर्प्स कमांडर स्तरावर सुमारे १६ तास ही बैठक चालली.
गलवान खोऱ्यातील सीमावाद मिटला असला तरी भारत-चीन सीमेवर अनेक विषयांवरून मतभेद आहेत. यातील पूर्व लडाख, गोग्रा हाईट्स, डेपसांग प्लेन्स आणि हॉट स्प्रिंग हे भूभाग महत्त्वाचे असून येथील सीमावाद मिटवण्यावर चर्चा झाली.
गलवान खोऱ्यातील पँगाँग लेकच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावरून सैन्य माघारी हटल्यानंतर दोनच दिवसांनी पुन्हा चर्चा सुरू करण्यात आली असून लवकरच तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये लष्करी, राजनैतिक आणि विशेष प्रतिनिधी स्तरावर अनेकदा चर्चा झाली आहे.
दरम्यान, संसदेत बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारताची एक इंचही जमीन देणार नसल्याचं म्हटलं आहे. गेल्या वर्षभरापासून भारत-चीन सीमेवर तणाव सुरू आहे. सीमावादात दोन्ही देशांमध्ये जे काही मुद्दे आहेत त्यावरही लवकरत तोडगा काढला जाईल, असं आश्वासन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं आहे.
चीननं पहिल्यांदाच गलवान खोऱ्यातील संघर्षात त्यांचे जवान मारले गेल्याची कबुली दिली आहे. गेल्यावर्षीच्या जूनमध्ये गलवान खोऱ्यात सीमेनजीक भारत आणि चीनी सैनिकांमध्ये धुमश्चक्री झाली होती. यात काराकोरममध्ये तैनात असलेले ५ अधिकारी आणि जवान ठार झाल्याचे चीनकडून सांगण्यात आले आहे.