मुंबई: मुंबईमधील कोरोना रुग्णसंख्या गेल्या दहा दिवसांमध्ये पुन्हा वाढू लागली आहे. मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या २०० वरून आता ४०० च्या आसपास पोहोचली आहे. चिंतेची बाब म्हणजे,रुग्णवाढीचा दर वाढला असून रुग्ण दुपटीचा कालावधी कमी झाला आहे.
ऑगस्टच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत कोरोन रुग्णसंख्या कमी होत होती. मात्र गेल्या दहा दिवसांत ही संख्या पुन्हा वाढली असल्याचं दिसून येत आहे. टाळेबंदी शिथिल केल्यापासून बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे पुन्हा रुग्णवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. गेल्या १० दिवसांतील आकडेवारीवरून रुग्णवाढ होत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.
मुंबईतील रुग्णवाढीचा दर हा दहा दिवसांपूर्वी ०.०३ टक्क्यांपर्यंत खाली गेला होता. उपचाराधीन रुग्णांची संख्याही ३,००० च्या खाली होती. रुग्ण दुपटीचा कालावधीही २,००० दिवसांपेक्षा अधिक होता. मात्र आता रुग्ण दुपटीचा कालावधी हा १५७७ दिवसांपर्यंत खाली आला आहे, तर रुग्णवाढीचा दर ०.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुंबईतील करोना रुग्णांची दैनंदिन संख्या ऑगस्टच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत दोनशेच्या आसपास होती. मात्र पुन्हा एकदा तीनशे ते चारशेपर्यंत रुग्ण आढळू लागले आहेत. तिसऱ्या लाटेचा धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे.