पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाची दाणादाण उडाली असून सात महापालिकांवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. तर, पंजाबच्या 109 नगरपालिका आणि नगर पंचायतींची मतगणना सुरू आहे.
गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्याचे नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. त्यात प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी सहभागी आहेत. या पार्श्वभूमीवर हा निकाल समोर आला आहे. मोगा, होशियारपूर, कपूरथला, अबोहर, पठाणकोट, बटाला आणि भटिंडा या महापालिका काँग्रेसने जिंकल्या आहेत. भटिंडा महानगरपालिकेवर काँग्रेसने 53 वर्षानंतर विजय मिळवला आहे. भटिंडा लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व शिरोमणी अकाली दलच्या हरसिमरत बादल करतात. कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरुन त्या अलीकडेच भाजपाप्रणित रालोआतून बाहेर पडल्या आहेत. मोहाली महापालिकेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे.
गत रविवारी (14 फेब्रुवारी) 109 नगपालिका, नगर पंचायत आणि सात महापालिका निवडणुकीसाठी मतदान झाले होते. त्यावेली एकूण 71.39 टक्के मतदानाची नोंद झाली होती.