एकीकडे राज्यात फ्रंटलाईन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रिकॉशन डोस व बुस्टर डोस मिळायला सुरुवात झाली. त्यातच महाराष्ट्रात कोरोना लशीचा एकही डोस न घेतलेल्या नागरिकांची संख्या खूपच जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील ९८ लाख नागरिकांनी आतापर्यंत करोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक लसीकरण झालेले राज्य आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन लागणाऱ्या किंवा अतिदक्षता विभागात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांपैकी बहुतांश जणांनी कोरोना लस घेतलेली नाही. काहीजणांनी लसीचा केवळ एकच डोस घेतलेला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांना लस देण्यासाठी प्रशासनाने पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
करोना लस घेतलेल्या नागरिकांना सध्या करोनाची लागण होत असली तरी त्यांच्यामधील लक्षणे सौम्य आहेत. परंतु, लस न घेतलेल्या नागरिकांच्या आजाराची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे करोना लस ही उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना लस घ्यावी, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते.