पनवेल येथील करंजाडे येथे राहणार्या 36 वर्षीय पत्नीच्या चेहर्यावर अॅसिड फेकून पसार झालेल्या पतीला पनवेल शहर पोलिसांनी त्याच्या झायलो गाडीसह ताब्यात घेतले आहे. त्याला पनवेल येथील न्यायालयात हजर केले असता 11 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 39 वर्षीय पवन पाटील याने तिच्या राहत्या घरी येवून अंगावर धावून जात हातातील प्लॅस्टीक बाटलीमधील द्रवरूप अँसिड पत्नीच्या चेहर्यावर फेकून तो तेथून पसार झाला होता.
महिला कौटुंबिक वादामुळे पतीपासून विभक्त राहते, 15 दिवसांपुर्वी पतीने त्यांच्या व्हट्सअँप स्टेटसवर पत्नीचे आक्षेपार्ह फोटो ठेवल्याने त्याच्या विरूध्द पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीचा राग मनात धरून पती पवन पाटील याने तिच्या राहते घरी येवून अंगावर धावून गेला. आणि हातातील प्लॅस्टीक बाटलीमधील द्रवरूप अँसिड पत्नीच्या चेहर्यावर फेकून तो तेथून पसार झाला होता. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करताच वपोनि अजयकुमार लांडगे, पो.नि.गुन्हे संजय जोशी यांच्या सुचनेनुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक फरताडे आदींच्या पथकाने त्याच्या चालू मोबाईलच्याद्वारे तांत्रिक तपासाचा आधार घेवून तसेच गुप्त बातमीदाराच्या आधारे सदर इसम हा पळस्पे याभागात त्याच्याकडे असलेल्या झायलो गाडीसह येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवळे करीत आहेत. या संदर्भात त्यांनी सदर आरोपीला पनवेल न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने 11 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.