केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय सुरक्षा दलाच्या (बीएसफ) १८ व्या शौर्य पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी भारताच्या शेजारील देशांशी असलेल्या सीमेवर कुंपण घालण्याचं काम २०२२ पर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन दिलं. सिमेवर दहशतवाद्यांशी सामना करताना वीरमरण आलेल्या जवानांना आदरांजली वाहिली.
"देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व जवानांना मी सलाम करतो. भारतीय जवान सीमेवर तैनात आहेत म्हणून आपण सुखानं जगत असतो. जवानांमुळेच देशात आत शांतता आणि लोकशाही नांदत आहे. देशाच्या संरक्षणासाठी भारतीय जवानांनी दिलेल्या बलिदानाला कधीच विसरता येणार नाही", असं अमित शाह म्हणाले.
भारताच्या शेजारील देशांशी असलेल्या सीमेवर कुंपणाचं काम सुरू असून त्यात कुठंही अपूर्ण काम राहिलं तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. भारतीय सीमेला संपूर्णपणे कुंपणानं बंदिस्त करण्याचं काम अद्याप सुरू आहे. २०२२ पर्यंत हे काम पूर्ण होईल आणि देशाच्या सीमा पूर्णपणे बंदिस्त होतील, असं आश्वासन अमित शाह यांनी यावेळी दिलं.