डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
त्वचेवर जर डाग असले तर ते अजिबात चांगले वाटत नाही. आपली त्वचा नितळ, आकर्षक आणि स्वच्छ असावी असं कोणाला वाटत नाही. जखम झाली, भाजलं, खरचटलं, किंवा मधमाशी वगैरे चावली तर नंतर बऱ्याचदा त्या ठिकाणी डाग राहतो. बरेच त्वचारोग असे असतात की त्याचे त्वचेवर काळपट डाग राहतात. कधी कधी चेहऱ्यावर मुरुमाचे डाग राहतात, कधी कधी चाळिशीच्या आसपास चेहऱ्यावर ब्लॅक पिगमेंटेशन दिसू लागतं.
यावर उपाय म्हणजे आवळा, आंबेहळद आणि पुनर्नवा ही एक वनस्पती आहे. ज्या ठिकाणी काळा डाग आहे त्यावर या तीनही वनस्पतींच्या मिश्रणाचा लेप लावावा. नुसतं चूर्ण एकत्र करून त्याचा लेप लावण्याऐवजी जर सहाणेवर या वनस्पती उगाळून तयार केलेली पेस्ट वापरली तर अधिक चांगला आणि पटकन गुण येतो.
यासाठी सहाणेवर थोडं पाणी घ्यावं, त्यात आवळकाठी, आंबेहळद आणि पुनर्नवा या वनस्पती उगाळून समभाग पेस्ट तयार करावी आणि ज्या ठिकाणी काळा डाग असेल त्या ठिकाणी लावून ठेवावी. साधारण वीस पंचवीस मिनिटांनी किंवा लेप पूर्ण सुकण्याच्या आधी धुवून टाकावा. रोज किंवा एक दिवस आड हा उपाय करता येतो काळ्या डागांचं प्रमाण कमी होत जातं.