डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
गर्भसंस्कारातला पहिला चरण म्हणजे बीजसंस्कार. यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे उभयतांनी आहारात बदल करणं. युद्धात कधीही पराभूत न होणारी ती अयोध्या, दहाही इंद्रियांवर विजय मिळवलेला असा दशरथ राजा, सर्व कार्यात कुशलता मिळवलेली ती कौसल्या. अशा प्रकारे सगळ्या आदर्श परिस्थितीतही दशरथ राजाला संतानप्राप्तीसाठी काय करावं लागलं? पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागला आणि त्यात प्रत्यक्ष अग्नी देवांनी प्रकट होऊन तिन्ही राण्यांना जे पायस दिलं, त्यातून श्रीरामांचा जन्म झाला.
राम जन्माच्या या कथेत जसा यज्ञ आहे, तसा तो उदरभरण नव्हे जाणिजे यज्ञ कर्म या रूपात आपल्यालाही करता येतो. खरंतर प्रत्येकानीच हे लक्षात ठेवायला हवं. पण एक जीव जन्माला घालणं, ही जी क्रिएटिव्हिटीची परम सीमा आहे, ती साधण्यासाठी बीजसंस्कारात आहार हा एखाद्या यज्ञाप्रमाणे करायलाच हवा. भूक लागली की पोट भरण्यासाठी समोर येईल ते खाणं याला यज्ञ म्हणता येईल का? अर्थातच नाही. यज्ञात जसं, शास्त्रात सांगितलेलं तेच, योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी समिधेच्या रूपात अर्पण केलं जातं, त्याचप्रमाणे स्त्री-पुरुषांनीही प्रकृतीला अनुकूल अन्न सेवन करणं हे महत्त्वाचं होय.
उदाहरणादाखल सांगायचं तर, धान्यांमध्ये देशी गहू किंवा खपली गहू, लोकल एरियात उगणारा तांदूळ, ज्वारी, नाचणी वगैरे. डाळींमध्ये मूग, तूर आणि मसूर. कडधान्यांमध्ये मूग, मटकी, मसूर, गावरान चवळी, अधून मधून उडीद. भाज्यांमध्ये वेलावर येणाऱ्या फळभाज्या म्हणजे दुधी, पडवळ, परवर, तोंडली, घोसाळी, दोडकी, कार्ल, तांबडा भोपळा, टिंडा, कर्टोली, भेंडी वगैरे. दुधाच्या पदार्थांमध्ये भारतीय वंशाच्या गाईचं किंवा म्हशीचं A2 दूध, ताजं गोड ताक, घरचं लोणी आणि साजूक तूप कोशिंबिरीसाठी काकडी, गाजर, मुळा, ऑरगॅनिक बीट रूट, अधून मधून टोमॅटो अशाप्रकारे घेतलेला साधा, सात्विक आहार हा ‘जाणिजे यज्ञ कर्म’ या संकल्पनेमध्ये बसला की त्यातून उभयतांची शक्ती वाढते, शुक्रधातूला ताकद मिळते आणि गर्भधारणा होण्यास मदत मिळते.