डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
स्वर्गातल्या देव देवतांनाही क्षीरसागर घुसळल्यानंतर जे मिळालं ते अमृत. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक नाही तर पाच अमृतं सांगितलेली आहेत. आलं का लक्षात कशाबद्दल बोलतोय ते? पंचामृतातील पाच गोष्टी असतात-
तूप - घरी पारंपारिक पद्धतीने बनवलेलं
मध - शुद्ध आणि गरम न केलेलं
दही - रात्री विरजण लावून सकाळी छान जमलेली
खडीसाखर - प्रसादासाठी वापरतात ती आणि
दूध - भारतीय वंशाच्या गाईचं शुद्ध दूध
या पाच अमृता समान गोष्टी एकत्र केल्या की तयार होतं पंचामृत. जो नशीबवान आहे, त्याच्या दिवसाची सुरुवात पंचामृताने होते. कारण रोज पंचामृत घेतल्याने शक्ती टिकून राहते, पटकन थकवा येत नाही, प्रतिकारशक्ती उत्तम राहते, कॉम्प्लेक्शन सुधारते, डोळे तेजस्वी होतात, बुद्धी स्मृती एकाग्रता वाढतात, मेंदू, हृदय वगैरे महत्त्वाच्या अवयवांना ताकद मिळते तसेच केस गळणे, पांढरे होणे कमी होते, कंबर दुखी, गुडघेदुखी सारखे वयानुसार मागे लागणारे त्रास दूर राहतात.
रोज सकाळी जमलं तर चांदीच्या वाटीत, नाहीतर साध्या वाटीत सर्वप्रथम दही, त्यात साखर, पातळ तूप, मध प्रत्येकी 1-1 चमचा आणि 4-5 चमचे दूध टाकून तयार केलेलं पंचामृत लागतही छान आणि देतं अक्षय आरोग्याचं दान.