डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी आहे. असं म्हणतात की, स्वर्गातलं अमृत जेव्हा पृथ्वीवर पडलं, तेव्हा त्यातून हरितकीचं झाड तयार झालं. खरोखरच हरितकीचा युक्तीपूर्वक वापर केला तर ती सर्व रोगांवर उपयोगी पडते असं दिसतं.
हरीतकीचे भन्नाट उपाय
हरीतकी डोळ्यांसाठी विशेष उपयुक्त असते. सहाणेवर दोन थेंब मध घ्यावं, त्यात हरितकीचं फळ उगाळलं की गुळगुळीत पेस्ट तयार होते. ही पेस्ट काजळाप्रमाणे डोळ्यात घातल्यानी डोळे उत्तम राहतात. विशेषतः सकाळी उठल्यावर डोळे चिकट होणं, डोळ्यातून वारंवार पाणी येणं, डोळे गढूळ झाल्यासारखं दिसणं या सगळ्या तक्रारींवर हरितकीचं हे अंजन उत्तम असतं. डोळे निरोगी रहावेत, दृष्टीदोष होऊ नयेत यासाठी सुद्धा नियमितपणे हे अंजन करण्याचा उपयोग होतो.
बरोबरीने त्रिफळाच्या माध्यमातून हरितकी पोटात घेणंही उत्तम असतं. हरितकी, आवळा आणि बेहडा या तीन वनस्पती समप्रमाणात एकत्र केल्या की तयार होतो त्रिफळा. एक चमचा त्रिफळा, अर्धा चमचा मध आणि एक चमचा तूप हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी घेण्यानी डोळे उत्तम राहतात. केस चांगले होतात म्हणजे केस पांढरे होणं, गळणं या तक्रारी कमी होऊ लागतात. शिवाय पोट साफ होण्यासही मदत मिळते.