वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री
दीपावली कधी आली आणि कधी संपली तेकळलच नाही, नाही का? घराची साफसफाई, आकाश कंदील, पणत्या, अभ्यंग स्नान, नवीन कपड्यांची खरेदी, फटाके, पाहुण्यांची ये जा या सगळ्या धांदलीत दरवर्षी बघता बघता दीपावली येते आणि जाते. पण दीपावलीच्या चार-पाच दिवसात केलेला फराळ, नाना प्रकारे तयार केलेली आणि पोट भरून खाल्लेली पक्वान्न आपल्याखूणा मागे ठेवतात हे सुद्धा खरं.
सध्याची आरोग्याबाबत जागरूक करणारी मंडळी फराळापासून चार हात दूर राहतात ते यामुळेच. खरं तर साजूक तुपात किंवा शेंगदाण्याच्या तेलात फराळ बनवला असेल आणि मुख्य म्हणजे घरी तयार केलेला असेल तर भीती बाळगायची काही गरजच नाही. पण जर रेडिमेंट तयार केलेल्या चकल्या, शेव खाल्ली असेल, बाहेरची किंवा आग्रहाची जेवणं झाली असतील, प्रवास झाला असेल तर या सगळ्याचा पचनावर आलेला ताण कमी करण्यासाठी घरच्या घरी हा एक उपाय करता येतो. यासाठी लागतात, देशी गुलाबाच्या पाकळ्या, बीया असलेल्या काळ्या मनुका, बडीशोप आणि सोनामुखीची पान.
पातेल्यात चार कप पाणी घ्यावं. यात ३ चमचे गुलाबाच्या पाकळ्या,दहा-बारा मनूका, एक चमचा बडीशोप आणि अर्धा चमचा सोनामुखीची पानं मिसळावीत. मध्यम आचेवर हे मिश्रण उकळण्यास ठेवावं. एक कप शिल्लक राहिलं की गाळून घ्यावं. चवीनुसार खडीसाखर मिसळून रात्री झोपण्यापूर्वी घ्यावं. यामुळे सकाळी एक दोन जुलाब होतात आणि पोट अगदी हलकं होतं. पाचक प्रणालीला, विशेषतः यकृताला डिटॉक्स करण्यासाठी हा उपाय प्रत्येकानी करून पहावा असा आहे. एरवी सुद्धा दर पंधरा दिवसांनी असं घरच्या घरी डिटॉक्स करण्यामुळे पचन सुधारतं, यकृताची कार्यक्षमता वाढते, भूक चांगली लागते अर्थातच आरोग्य, उत्साह आणि शक्ती मिळण्यास मदत मिळते. असाच घरच्या घरी करता येण्याजोग्या उपाय जाणून घेण्यासाठी पहात रहा.