डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
सौ. शलाका यांचा एक प्रश्न आला आहे, गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना वारंवार यूरिन इन्फेक्शनचा त्रास होत होता. डॉक्टरांचं औषध घेतलं की तात्पुरतं बरं वाटायचं. पण काही दिवसांनी पुन्हा जळजळ सुरू होते. प्लीज काही उपाय सुचवा.
यूरिन इन्फेक्शन हा स्त्रियांमधला खूप सामान्य त्रास आहे. जोवर मुळापासून उपचार होत नाहीत, तोवर पुन्हा पुन्हा हा त्रास होत राहतो. पारंपारिक औषधं घेण्यानी फक्त लक्षणं कमी होतात, परंतु आतलं इन्फेक्शन तसंच राहतं आणि थोडंही कारण मिळालं की पुन्हा उफाळून बाहेर येतं. आयुर्वेदिक औषधांचा मात्र या तक्रारीवर उत्तम उपयोग होताना दिसतो.
चंद्रप्रभा आणि पुनर्नवा घनवटी या दोन गोळ्या सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 याप्रकारे घेण्याने उपयोग होईल. जेवणानंतर दोन चमचे पुनर्नवासव, दोन चमचे पाण्यात मिसळून घेण्याचाही उपयोग होईल. ही सर्व औषधं आयुर्वेदिक औषधाच्या कुठल्याही दुकानात सहज मिळू शकतील. बरोबरीने आहारात कोबी, फ्लॉवर, गवार, ढोबळी मिरची, वांगं, पनीर, अंडी या गोष्टी टाळणं हे सुद्धा आवश्यक आहे. उपचारांमधे धातक्यादि तेलासारख्या तेलाचा पिचु नियमित वापरण्याचा आणि खालून धुरी घेण्याचाही उत्तम उपयोग होताना दिसतो.
धुरीसाठी, पेटलेल्या निखाऱ्यावर कडूनिंबाची पानं, वावडिंग, हळद, लसणाची टरफलं आणि थोडसं तूप टाकून धूप करता येतो. या उपायांनी बरं वाटेलच, पण इन्फेक्शन मूळापासून बरं होण्यासाठी एकदा वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणंही चांगलं.