दीपावलीचा महोत्सव सध्या चालू आहे. नवीन कपडे घालणं, वेगवेगळे दागिने घालणं, छान तयार होणं, दिव्याच्या प्रकाशानी घर-दार अंतर्बाह्य उजळून टाकणं, हे सगळं दीपावली मध्ये अध्याहृत असतच. पण जे बाहेर आहे, ते शरीराच्या आतही अनुभवता यायला हवं. दीपावलीचं तेज फक्त बाहेर नाही, तर शरीराच्या आतही जाणवायला हवं. तेव्हा त्याला खऱ्या अर्थानी दीपावली साजरी करणं म्हणता येतं. स्त्रियांच्या बाबतीत त्वचा, मुखवर्ण आणि त्वचेची सतेजता हे त्यांच खरं आभूषण असतं. आयुर्वेदाप्रमाणे रसधातू हा स्त्रीआरोग्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा असतो. रसधातू जितका शुद्ध आणि संपन्न, तितकी आपली त्वचा नितळ आणि आकर्षक असते.
या अशा रसधातूच्या शुद्धीसाठी एक अतिशय उत्तम वनस्पती म्हणजे अनंतमूळ. अनंतमूळाचा हिम हे रसधातूसाठी, पर्यायानी स्त्री आरोग्यासाठी आणि मुखवर्णासाठी एक उत्तम औषध असतं. कसा करायचा हा हिम? अनंतमूळ खलबत्त्यात कुटून त्याची भरड तयार करावी. काचेच्या ग्लासमध्ये एक चमचा भरड घ्यावी, यात एक कप पाणी घालून झाकून ठेवावं. कमीत कमी चार ते पाच तास किंवा रात्रभर भिजल्यावर, सकाळी हे पाणी सुती कापडातून गाळून घ्यावं आणि प्यावं.
हा हिम सुगंधी असतो. चवीला सुद्धा छान लागतो. आवडत असेल तर यात थोडी खडीसाखर टाकली तरी चालते.आयुर्वेदात जसा शतावरी कल्प असतो, तसा अनंत मुळापासूनही कल्प करून ठेवता येतो. सकाळी उठल्यावर एक कप दुधात, अर्धा चमचा शतावरी कल्प आणि अर्धा चमचा अनंत मुळाचा कल्प घेणं हे स्त्री आरोग्यासाठी चांगलं असतं. बरोबरीनी दीपावलीत हमखास केलं जाणारं अभ्यंग स्नान हे सुद्धा त्वचेसाठी वरदानच. दीपावलीच्या चार दिवसानंतरही रात्री झोपण्यापूर्वी अंगाला तेल लावणं आणि स्नान करताना साबणाऐवजी उटणं लावणं ही सवय सुरू केली तर त्यामुळे एकंदर आरोग्य, त्वचेचं सौंदर्य उत्तम राहील हे नक्की. स्त्री आरोग्य आणि सौंदर्य टिकावं आणि वाढावं यासाठी आयुर्वेदातले सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घेण्यासाठी पहात रहा