डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
आयुर्वेद आणि भारतीय संस्कृती यांनी संपूर्ण मानव जातीला दिलेलं एक अनमोल वरदान म्हणजे गर्भसंस्कार. गर्भसंस्कार हा शब्द घराघरात, अगदी साता समुद्रा पार पोहोचला आहे तो श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांच्यामुळे. आपला भारत म्हणजे कृषीप्रधान देश आहे. शेतकरी सुद्धा दरवर्षी नवीन पीक घेण्यापूर्वी जमिनीची मशागत करतो, बेस्ट क्वालिटीचं बियाणं आणतो, ऋतुमानाचा अंदाज घेऊन ते लावतो, वेळेवर खतपाण्याची व्यवस्था करतो तेव्हा कुठे त्याला मनाजोगतं उत्पन्न मिळतं. गहू आणि तांदुळासाठी जर शेतकरी इतकी तयारी करत असेल, तर घरात येणाऱ्या बाळाच्या आगमनाची आपणही तयारी नको का करायला?
आपल्या बाळाला कशाची कमी पडू नये यासाठी आई-बाबा, आजी आजोबा काहीही करायला तयार असतात. अक्षरशः जीवाचं रान करायलाही तयार असतात. पण जर बाळ हवं असेल असं ठरल्यावर त्या क्षणापासून गर्भ संस्कारांची मदत घेतली तर, जन्माला येणार बाळ हे गर्भसंस्कारांनी परिपूर्ण असतं ज्यामुळे त्याची संस्कारांच्या बाबतीत काळजी करावी लागत नाही. गर्भ संस्कारांची सुरुवात होते ती स्त्रीच्या आरोग्यापासून. स्त्रीने हार्मोनल बॅलन्सकडे लक्ष दिले तर, स्पर्म आणि ओव्हम उत्तम क्वालिटीचे होण्यासाठी मदत होते. गर्भारपणात खाणं, पिणं आणि वागणं याकडे लक्ष दिले आणि गर्भसंस्कार तसेच आयुर्वेदाची औषधे यांचा वापर केला तर जन्माला येणारं बाळ संस्कारांनी संपन्न होते. तसेच यामुळे बाळाचं आरोग्य, त्याची समज, त्याच्या डोळ्यांमधली चमक आणि इतर मुलांपेक्षा असलेलं बाळाचं वेगळेपण हे आपल्याला पदोपदी जाणवत राहतं.
म्हणूनच श्री गुरुजी म्हणतात, आई-वडील आपल्या बाळाला जी एक सर्वोत्तम भेट देऊ शकतात ती म्हणजे गर्भसंस्कार. संस्कारांची शिदोरी घेऊन जन्माला आलेलं बाळ, मग ती मुलगी असो का मुलगा, अख्या घराला, अख्या कुटुंबाला आनंद देणारा असते. नुसता आनंदच नाही तर ते बाळ अभिमानाचे ही कारण ठरते. वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत राम मंदिर तर उभं राहिलं पण खऱ्या अर्थाने रामराज्य अनुभवायचं असेल तर त्यासाठी गर्भसंस्कार हाच एकमेव उपाय आहे.