डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
दीपावली नंतर येणारी नवमी कुष्मांड नवमी नावानी साजरी केली जाते. कुष्मांड म्हणजे कोहळा किंवा पेठा. भोपळ्याच्या जातीत बसणारा कोहळा हे एक उत्तम औषध आहेच पण स्वयंपाक घरातही कोहळ्याचा नियमित वापर करता येतो.
कुष्मांड शब्दातला उष्म शब्दाचा अर्थ आहे उष्णता. अंड म्हणजे बीज. ज्याच्या बीजामध्ये अजिबात उष्णता नाही तोकुष्मांड. त्यामुळे कोहळा शरीरातील उष्णता कमी करतो. याशिवाय अनेक मानसिक रोगांवरही कोहळा हे एक प्रभावी औषध आहे. त्यामुळे खूप ताण असणाऱ्यांसाठी कोहळा हे एक उत्तम आहारद्रव्य आहे.
याची विशेषता ही की कोवळा कोहळा खायचा नसतो. त्यामुळे आहारात किंवा औषधात जून कोहळा वापरला जातो. पूर्ण वाढ झालेला, चांगला कोहळा असेल तर तो वर्षभर सुद्धा उत्तम राहतो. आज आपण कोहळ्याचं कोशिंबीर कसं बनवतात ते पाहूया.
कोहळा कापून त्याची साल काढावी. तसंच बिया सुद्धा काढून टाकाव्यात. पांढऱ्यागराचे चौकोनी तुकडे करावे. जाड बुडाच्या कढईत किंवा पातेल्यात शिजवून घ्यावेत. झाकण ठेवलं तर कोहळा पाच मिनिटात छान शिजतो.कोहळा शिजला की तो पूर्णपणे थंड होऊ द्यावा. आता पळीत दोन चमचे तूप घ्यावं, तूप गरम झालं की अर्धा चमचा जिरं, लाल मिरचीचे तुकडे आणि उडदाची डाळ टाकावी. उडदाची डाळ गुलाबीसर रंगाची झाली की कढीपत्ता टाकावा आणि गॅस बंद करावा. शिजलेल्या कोहळ्याच्या फोडींवर ही फोडणी टाकावी. चवीनुसार मीठ टाकावं आणि वरून थोडं किसलेलं खोबरं घालावं. आवडत असेल तर चिमूटभर साखर टाकली तरी चालते. कोहळ्याचं हे कोशिंबीर दिसतं छान, लागतं चवदार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असतं सुद्धा पौष्ठिक.