पेट्रोलियम कंपन्यांनी सलग इंधन दरात वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ३० पैशांनी, तर डिझेलचे दर ३५ पैशांनी महागले. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी वाढ झाल्यामुळे देशांतर्गत दर वाढले असल्याचे तेल वितरण कंपन्यांनी म्हटले आहे. या दरवाढीने आज मुंबईत पेट्रोलचा भाव ९५.७५ रुपये झाला आहे. सलग आठ दिवस केलेल्या दरवाढीने पेट्रोल आणि डिझेल सरासरी दोन रुपयांनी वाढले आहे.
या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल ८९.२९ रुपये लिटर, तर डिझेल ७९.७० रुपये लिटर झाले. मागील आठ दिवसांत पेट्रोल २.३६ रुपयांनी, तर डिझेल २.९१ रुपयांनी महागले.
देशभरात पेट्रोल २६ ते ३२ पैशांनी, तर डिझेल ३० ते ३५ पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोल ९५.७५ रुपये लिटर झाले आहे. १०० रुपये लिटर होण्यासाठी आता अवघे ४ रुपये बाकी आहेत. डिझेलचे दर ८६.७२ रुपये लिटर झाले आहेत. डिझेलही आता ९० रुपयांच्या उंबरठ्यावर आहेत. दिल्ली वगळता देशातील इतर सर्वच महानगरांत पेट्रोल ९० रुपयांच्या वर, तर डिझेल ८० रुपयांच्या वर गेले आहे. प्रीमियम पेट्रोलचे दर महाराष्ट्र, १०० रुपयांच्या वर गेले आहेत.
तेल वितरण कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढून ६३.५ डॉलर प्रतिबॅरल झाल्या आहेत. मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत.