लोकशाही न्यूज नेटवर्क
उत्तराखंडमधल्या नंदादेवी हिमकड्याचा काही भाग रविवारी सकाळी कोसळला. त्यामुळे धौलीगंगा, ऋषीगंगा आणि अलनंदा या गंगेच्या उपनद्यांना पूर आला. या प्रलयात नदीवरचे जलविद्युत प्रकल्प वाहून गेले. हे सर्व ग्लोबल वॉर्मिंगमळे घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
केदारनाथमध्ये रविवारी घडलेल्या घटनेमुळे 2013 मध्ये आलेल्या महाप्रलयाची पुन्हा आठवण झाली. पण आताची घटना फेब्रुवारीत महिन्यात म्हणजे थंडीच्या दिवसांत घडली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या भागात थोड्याथोडक्या नव्हे तर, जवळपास एक हजार हिमनद्या आहेत. पण ग्लोबल वॉर्मिंगमुळे गेल्या तीन दशकांत तिथला बर्फ झपाट्यानं कमी होत आहे.
चिंतेची बाबा ही आहे की, हिमालयातल्या हिमनद्या जगातल्या इतर हिमनद्यांपेक्षा खूप वेगानं आकुंचन पावत आहेत, म्हणजेच त्या वितळत आहेत. हिमनद्या वितळण्याचा वेग गेल्या काही वर्षांत दुप्पट झाल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. 1975 ते 2000 या काळात दरवर्षी हिमनद्यांचा बर्फ 0.25 मीटरने कमी झाला. 1990 तापमानवाढीला सुरुवात झाली. त्यानंतर साधारणत: 2000 सालापर्यंत दरवर्षी अर्धा मीटर बर्फ कमी होत गेला. 2000 ते 2016 दरम्यान सरासरी तापमान एक अंश सेल्सिअसने वाढले आहे.
तापमानवाढीमुळे बर्फ वितळतो आणि हिमनद्यांच्या पाण्याची पातळी वाढून प्रलय येतो. दुसरं कारण असे आहे की, हिमालयात अनेकदा भूस्खलन होते. त्यामुळे हिमनद्यांच्या मार्गात अडथळे निर्माण होतात आणि हिमनद्यांचा बर्फ वितळून नद्यांना पूर येतो. 2013 साली केदारनाथमध्ये ढगफुटी होऊन महापूर आला होता आणि मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. त्यापूर्वीही एवढ्या मोठ्या नसल्या तरी अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. निसर्गात सतत काही ना काही उलथापालथ होत असली तरी वितळत असलेल्या हिमनद्यांना ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच माणूस जबाबदार आहे.