बुधवारी राज्यसभेमध्ये झालेल्या गदारोळानंतर आता देशभरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. या संबंधित सीसीटीव्हीही समोर आले आहे. दरम्यान या राड्यावर विरोधी पक्षांनी सत्ताधारी मोदी सरकारला जबाबदार धरलं आहे, तर सत्ताधाऱ्यांनी काँग्रेससहीत विरोधकांचा कट असल्याचा आरोप केला आहे. या सर्व घडामोडीत आता ज्या महिला खासदाराला धक्काबुक्की झाल्याचा आरोप होत आहे. या महिला म्हणजे काँग्रेस खासदार छाया वर्मा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
या गोंधळावर छाया वर्मा यांनी म्हटले, "आमचे एक खासदार कालच्या घटनेमध्ये जखमी झाले आहेत. त्यांना चुकीची वागणूक दिली गेली. पियुष गोयल यांना विचारा की सभागृहात इतके मार्शल्स ठेवण्याचं कारण काय? मी का माफी मागू?" असा प्रश्न छाया वर्मा यांनी विचारत उलट सत्ताधाऱ्यांवरच निशाणा साधला.
दरम्यान, सभागृह चालवणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं छाया वर्मा यावेळी म्हणाल्या. "या प्रकाराला कोण जबाबदार आहे? संसदेचं कामकाज चालवणं ही सरकारची जबाबदारी आहे. आम्ही फक्त लोकांचा आवाज संसदेत मांडतो. जर लोकांचा आवाज ऐकलाच गेला नाही, तर हे होणार", असं देखील छाया वर्मा म्हणाल्या.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय ?
राज्यसभेत बुधवारी राडा झाल्यानंतर त्या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज गुरुवारी सकाळी एएनआयनं आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केलं. या फूटेजमध्ये विरोधी बाकांवरील सदस्य आक्रमक झालेले असतानाच त्यांनी वेलमध्ये येऊन नारेबाजी करायला सुरुवात केली. यावेळी त्यांना आवरण्यासाठी मार्शल्स बोलावण्यात आले. या मार्शल्सनी नंतर राज्यसभेत एक कडंच तयार केलं. या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी माफीची मागणी केली आहे एक महिला खासदाराची एका महिला मार्शलसोबत धक्काबुक्की झाल्याचं राज्यसभेतील सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. या महिला म्हणजे काँग्रेस खासदार छाया वर्मा असल्याचं सांगितलं जात आहे.