मुंबईच्या दहिसरमधून पोलिसांनी सात कोटीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. यात एका आंतरराज्यीय टोळीला आज पोलिसांनी ताब्यात घेतलं. या टोळीकडून सात कोटी रुपये, ७ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन्स, एक लॅपटॉप आणि काही कागदपत्रं जप्त करण्यात आली आहे.
मुंबई चार व्यक्ती २००० रुपये किमतीच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी दहिसरमध्ये येणार असल्याचं पोलिसांना कळलं. त्याप्रमाणे माहिती मिळालेल्या गाडीची झडती घेतली असता या गाडीमध्ये २००० रुपयांच्या नोटांचे २५० बंडल आढळून आले. २००० रुपयांच्या एकूण २५ हजार नोटा असे एकूण पाच कोटी रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यानंतर सविस्तर कारवाई करून, आरोपींची झडती घेतल्यानंतर पोलिसांना ७ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन्स, एक लॅपटॉप, आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहन चालक परवाना, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र आणि २८,१७० रोख रक्कम सापडली आहे.
स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे आरोपी बनावट नोटा छापून त्यांचे वितरण करत होते. या प्रकरणी सविस्तर पंचनामा करण्यात आला असून सात जणांच्या टोळीला अटकही करण्यात आली आहे.