भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून लतादीदींना श्रद्धांजली वाहत आहेत.
याच पार्श्वभूमीवर लतादीदी यांचे स्मारक उभारण्याची मागणी होत आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली आहे.
भाजपाचे आमदार राम कदम म्हणाले की, भारतरत्न लतादीदी यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे कोट्यवधी चाहते, संगीतप्रेमी आणि लतादीदींच्या हितचिंतकांच्या वतीने माझी विनंती आहे की, लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये उभारण्यात यावं, ज्या ठिकाणी त्या पंचतत्वात विलीन झाल्या, असं राम कदम यांनी पत्रात नमूद केलं आहे. या मागणीचा विचार करून तात्काळ स्मारक उभारायला हवे. कारण हे स्थळ जगासाठी प्रेरणा देणारे ठरेल.