'द काश्मीर फाइल्स' या प्रसिद्ध चित्रपट वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या निर्दयी अत्याचाराची कहाणी सांगणारा हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला.
यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारांची यादी जाहीर झाली आहे. 68 व्या फिल्मफेअर पुरस्कार 2023 मध्ये या चित्रपटाला 7 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या कश्मीर फाईल्स या चित्रपटाला यंदा अनेक नामांकनं मिळाली आहेत. मात्र त्यांनी हे पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. याबद्दल एक ट्विट करत त्यांनी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यावर जोरदार टीका केली आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत म्हटले आहे की, फिल्मफेअरच्या अनैतिक जगात संजय भन्साळी किंवा सूरज बडजात्यासारख्या मास्टर डायरेक्टर्सना महत्व नाही. संजय भन्साळीची ओळख आलिया भट्ट आहे, तर सूरज यांची ओळख मिस्टर बच्चन आहेत. बॉलिवूडमधील भ्रष्ट, अनैतिक आणि गुंड प्रवृत्तीच्या विरोधात माझा निषेध आणि नाराजी व्यक्त करण्यासाठी मी असे पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, स्टार्सशिवाय इतर कोणीही महत्वाचे नाही. स्टार्सशिवाय इतर लोकांचा कुणाला काही फरक पडत नाही. फिल्मफेअर अवॉर्ड्सवरुनच चित्रपट निर्मात्यांची प्रतिष्ठा ठरवली जाते, असे नाही पण ही अपमानास्पद व्यवस्था संपली पाहिजे. जे पुरस्कार जिंकले त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि जे पुरस्कार नाही जिंकले त्यांचे देखील अभिनंदन करतो. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं...मेरी कोशिश है ये सूरत बदलनी चाहिए...मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही...हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए असे त्यांनी लिहिले आहे.