हैदराबाद : अभिनेता विजय देवरकोंडाने केवळ दक्षिणेतच नाही तर हिंदीच्या हृदयातील प्रेक्षकांमध्येही स्थान निर्माण केले आहे. नुकताच त्याचा लायगर चित्रपटात रिलीझ झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही अप्रतिम कामगिरी केली नाही. पण, या चित्रपटामुळे त्याला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विजयची बुधवारी ईडीने 'लायगर' चित्रपटाच्या फंडींगबाबत चौकशी केली. 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्याला सोडून दिले. याबाबत बोलताना विजय देवरकोंडा म्हणाला, पॉप्युलॅरिटीचा त्रास आणि साईड इफेक्टही असतात, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
ईडीने केवळ देवरकोंडाच नाही तर निर्माती चार्मी कौर यांचीही या चित्रपटातील फंडींगबाबत चौकशी केली होती. ईडीने 17 नोव्हेंबर रोजी कौर यांची चौकशी केली होती. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याच्या आरोपांवर त्यांची विशेष चौकशी करण्यात आली. मनी लाँड्रिंग प्रकरणातही विजयचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाच्या निर्मिती आणि प्रमोशनमध्ये काळ्या पैशाचा वापर करण्यात आल्याची चर्चा आहे.
धर्मा प्रॉडक्शनने लायगरमध्ये पैसे गुंतवले होते. हा चित्रपट सुमारे 120 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. परंतु, बॉक्स ऑफिसवर केवळ 60.80 कोटींचा गल्ला जमवू शकला. चित्रपटाचे बहुतांश शूटिंग लास वेगासमध्ये झाले होते. यात त्याच्यासोबत अनन्या पांडेही मुख्य भूमिकेत होती.