बॉलीवूडचे दिग्गज आणि अष्टपैलू अभिनेते अनुपम खेर यांनी ५०० हून अधिक चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटांमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये विनोदी, व्हिलनसारख्या भूमिकांचाही समावेश आहे. आज ७ मार्चला अनुपम खेर यांचा जन्मदिवस आहे. जाणून घेऊयात त्यांच्या फिल्मी करिअरमधील महत्वाच्या भूमिकांबद्दल सविस्तर माहिती.
अनुपम खेर यांचा जन्म शिमला मध्ये ७ मार्च १९५५ ला झाला होता. त्यांचे वडील पुष्कर नाथ कश्मीरी पंडित आणि पेशाने एक क्लर्क होते. दुलारी खेर असं आईचं नाव होतं. शिमलामध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर अनुपम यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी) येथून पुढील शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी काही वर्षांपर्यंत थिएटर केलं. त्यानंतर बॉलीवूडमध्ये छाप टाकण्यासाठी खेर यांनी मुंबई शहर गाठलं.
सारांश (१९८४)
अनुपम खेर यांनी सारांश चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटामुळे अनुपम खेर प्रकाशझोतात आले. विशेष म्हणजे अनुपम यांनी या डेब्यू फिल्ममध्ये ६५ वर्षांच्या शिक्षकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे अनुपम यांना सर्वश्रेष्ठ अभिनेता फिल्मफेयर पुरस्कार मिळालं होतं.
कर्मा (१९८६)
पहिल्या चित्रपटात वयोवृद्ध व्यक्तीची भूमिका साकारल्यानंतर दुसऱ्या चित्रपटात त्यांनी निगेटिव्ह रोल केला होता. कर्मा चित्रपटात अनुपम यांनी डॉक्टर गँगचं भूमिका साकारली होती. दिलीप कुमार, अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांचा हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता.
राम लखन (१९८९)
सुभाष घाई यांच्या दिग्दर्शनात बनलेला राम लखन चित्रपटही सुपर हिट झाला होता. या चित्रपटात त्यांनी विनोदी भूमिका साकारली होती. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या वडीलांची भूमिका त्यांनी या चित्रपटात साकारली होती. हा चित्रपट गाजल्याने अनुपम खेर प्रकाशझोतात आले.
डॅडी (१९९८)
महेश भट्ट यांच्या दिग्दर्शनात बनलेला डॅडी चित्रपट १९८९ मध्ये दूरदर्शनवर प्रदर्शित झाला होता. पूजा भट्ट यांची ही डेब्यू फिल्म होती. अनुपम यांनी या चित्रपटात 'आनंद'ची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अप्रतिम अभिनय केल्याने अनुपम यांना स्पेशल ज्यूरीचं नॅशनल अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.