आई आणि मुलीच्या सुरेख नात्यावर भाष्य करणारा 'मायलेक' चित्रपट येत्या १९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सोनाली खरे आणि सनाया आनंद या रिअल 'मायलेकी' प्रेक्षकांना रिलमध्ये पाहायला मिळणार आहेत. चित्रपटातील गाणी, ट्रेलर सोनाली आणि सनायाची सुंदर केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच यात विशेष लक्ष वेधून घेत आहे तो उमेश कामत. उमेशची या चित्रपटात एकंदरच कूल आणि इंटरेस्टिंग भूमिका असल्याचे दिसतेय. खरंतर हा चित्रपट आई आणि मुलीवर बेतलेला असतानाही उमेशने ही भूमिका का स्वीकारली याचा खुलासा त्याने स्वतःच केला आहे.
याबद्दल उमेश कामत म्हणतो, '' ज्यावेळी सोनालीने मला या चित्रपटासाठी फोन केला त्यावेळीच तिने मला भूमिका काय असणार याची पूर्वकल्पना दिली आणि ही भूमिका तू करणार का विचारले आणि यावर माझे उत्तर हो होते. मला ही कथाच मुळात इतकी आवडली की माझ्या भूमिकेची लांबी किती आहे, हे माझ्यासाठी त्यावेळी महत्वाचे नव्हतेच. मी विषयाला प्राधान्य दिले. या नात्याचा मी नेहमीच आदर करतो. खूप सुंदर असे हे नाते आहे. प्रिया आणि तिच्या आईचे नाते मी जवळून अनुभवले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मी सोनाली आणि सनायाचेही नाते मला अनुभवता आले. इंडस्ट्रीमध्येही अशा अनेक 'मायलेकी' आहेत, ज्यांचे नाते खूपच सुंदर आहे. हा विषय चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर येतोय, खूप भारी आहे, म्हणून हा चित्रपट मी केला.''
ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटाची सोनाली आनंद निर्माती असून या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत बिजय आनंद, शुभांगी लाटकर आणि संजय मोने या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. कल्पिता खरे, बिजय आनंद सहनिर्मिती या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत.