काली चित्रपटाच्या (Kaali movie poster) पोस्टरवरून उल्हासनगरात ब्राह्मण समाज आणि तृतीयपंथीयांमध्ये नाराजी पसरली आहे. हा चित्रपट तयार करणाऱ्या फिल्ममेकर लीना मणीमेकलाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ब्राह्मण समाज आणि तृतीयपंथीयांनी केली आहे.
भारतीय वंशाच्या फिल्ममेकर लीना मणीमेकलाई यांनी कॅनडामधील टोरंटो शहरात असलेल्या आगा खान म्युझियममध्ये 'रिद्म्स ऑफ कॅनडा' या सेगमेंटमध्ये 'काली' चित्रपटाचं पोस्टर लॉन्च केलं. या पोस्टरमध्ये काली माता एका हाताने सिगरेट पिताना, तर दुसऱ्या हातात एलजीबीटी कम्युनिटीचा झेंडा घेतलेली दाखवली आहे. या पोस्टरबाबत ऑनलाईन नाराजी व्यक्त होऊ लागल्यानंतर भारतात उत्तर प्रदेश आणि दिल्लीत लीना मणीमेकलाई यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले.
तर दुसरीकडे कॅनडामधील भारतीय दूतावसानेही या म्युझियमला प्रक्षोभक गोष्टींचा समावेश न करण्याची मागणी केली. एकीकडे कॅनडात या घडामोडी सुरू असतानाच उल्हासनगरात ब्राह्मण समाज आणि तृतीयपंथीयांनी एकत्र येत लीना मणीमेकलाई यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना निवेदन दिलं. यामध्ये लीना मणीमेकलाई विरोधात तातडीनं गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, हा गदारोळ पाहून फिल्ममेकर लीना मणीमेकलाई यांनी याबाबत ट्विट करून स्पष्टीकरण दिलं आहे. हा चित्रपट एक दिवस काली माता टोरंटो शहराच्या रस्त्यावर अवतरते आणि त्यानंतर तिच्या आजूबाजूला काय गोष्टी घडतात यावर अवलंबून आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.