राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली आहे. यामध्ये २०२३ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज ही घोषणा केली.
गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, राज्य सांस्कृतिक पुरस्कार इत्यादी पुरस्कार सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी देण्यात येतात. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत पुरस्काराच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली असून राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाने जाहीर केलेले पुरस्कार
- २०२३ चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झालेला आहे.
- भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार २०२२ साठी पंडीत उल्हास कशाळकर यांचे नाव घोषित झाले असून २०२३ च्या पुरस्कारासाठी पंडीत शशिकांत (नाना) श्रीधर मुळ्ये यांची घोषणा करण्यात आली आहे.
- नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार २०२२ साठी सुहासिनी देशपांडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे, तर २०२३ साठी अशोक समेळ यांना पुरस्कार घोषित झाला आहे.
- संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव २०२२ चा पुरस्कार नयना आपटे यांना जाहीर झाला असून, २०२३ च्या पुरस्कारासाठी पंडीत मकरंद कुंडले यांची निवड झाली आहे.
- राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये एकूण बारा वर्गवारी असून, यामधील प्रत्येक वर्गवारी मध्ये दोन वर्षाचे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत.
- नाटक या विभागासाठी २०२२ चा पुरस्कार वंदना गुप्ते यांना तर २०२३चा पुरस्कार ज्योती सुभाष यांना जाहीर झाला आहे.