नेटफ्लिक्सच्या'मनी हाइस्ट'या वेबसिरीज परदेशातच नव्हे तर भारतातसुद्धा आपली जादू दाखवली आहे. या बहुप्रतिक्षित सिरीजचा पाचवा सीझन 3 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.'मनी हाइस्ट'चा पुढील सिझन पाहण्यासाठी प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून आतूर होते. अखेर प्रेक्षकांचीही प्रतीक्षा आता संपणार आहे.
'मनी हाइस्ट'चा पाचवा सीझन हा शेवटचा सिझन असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ताणली गेली आहे. हा सिझन पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. चाहत्यांमध्ये या वेबसिरीस ची क्रेझ इतकी आहे की एका कंपनीने चक्क वेबसिरीज पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. हे कोणत्याही इतर देशात घडत नसून भारतात घडत आहे. जयपूरमधील एका कंपनीने 'मनी हाइस्ट'पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुट्टी दिलीय. जयपूरमधील 'वर्वे लॉजिक'या कंपनीने ३ सप्टेंबरला सुट्टी जाहीर केली आहे. 'नेटफ्लिक्स अॅन्ड चिल हॉलिडे'या नावाने कंपनीने सुट्टीची घोषणा केलीय.
कंपनीने सीईओ अभिषेक जैन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली. यासोबतच अभिषेक जैन यांनी करोना महामारीच्या काळात कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन काम केल्याबद्दल कर्मचाऱ्यांचे आभार देखील मानले आहेत. "काही वेळाने ब्रेक घेणं ठीक असतं" असं म्हणत त्यांनी कर्मचाऱ्यांना ही आनंदाची बातमी दिलीय.
नेटफ्लिक्सने 'मनी हाइस्ट'च्या भारतीय फॅन्ससाठी 'बेला चाओ' या त्यांच्या एंथमचे देसी व्हर्जन तयार केलं आहे. या गाण्याला 'जल्दी आओ' असं नावं देण्यात आलं आहे. 'मनी हाइस्ट'चा पाचवा आणि शेवटचा सिझन दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्याचा पहिला भाग ३ सप्टेंबर २०२१ तर दुसरा भाग ३ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.