गेल्या काही दिवसांपासून धर्मवीर चित्रपट चर्चेत आला आहे. हा चित्रपट आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित आहे. तर या चित्रपटात आनंद दिघे (anand dighe) यांची भूमिका प्रसाद ओक (prasad oak) साकारणार आहे.
प्रेक्षकांची या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात बाळासाहेब असणार की नाही, तसेच त्यांची भूमिका कोण साकारणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडत आहेत. पण नुकत्याच आलेल्या 'गुरुपौर्णिमा' या गाण्यातून बाळासाहेबांचे रूप दिसले आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण विठ्ठल तरडे (pravin tharde) यांनी केले आहे. या आधी 'देऊळ बंद', 'मुळशी पॅटर्न' असे दर्जेदार चित्रपट प्रवीण यांनी दिग्दर्शित केले आहेत. तर 'सरसेनापती हंबीरराव' हा त्यांचा बहुचर्चित आगामी चित्रपट आहे.
'धर्मवीर' चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेले, ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास दाखवण्यात येणार आहे.
बाळासाहेबांची भूमिका साकारणारा नट कोण याबाबत अनेकांना माहित नाही. ही भूमिका 'मकरंद पाध्ये' या अभिनेत्याने साकारली आहे. 'गुरुपौर्णिमा' या गाण्यातून मकरंद, बाळासाहेब ठाकरेंच्या रूपात चाहत्यांच्या भेटीस आले.