पुणे : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. राहत्या घरातच त्यांचा मृत्यू झाला. तळेगाव आंबी एमआयडीसी येथील सोसायटीमध्ये महाजनी राहायचे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ते येथील एका सदनिकेत भाडेतत्वावर राहत होते. याच घरामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. मात्र दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रवींद्र महाजनी यांचा जन्म कर्नाटकातील बेळगावी झाला होता. रवींद्र महाजनी यांना शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. वडिलांच्या सल्ल्यानुसार रवींद्र महाजनी यांनी खालसा महाविद्यालयात प्रवेश घेतला. रवींद्र महाजनी यांनी अभिनेता व्हायचं ठरवलं होतं. अभिनयात नशीब अजमावण्यासाठी रवींद्र महाजनी यांनी खूप प्रयत्न केला. त्याचवेळी त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे घरची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यानंतर त्यांनी कामे करण्यास सुरुवात करतानाच टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली.
मधुसूदन कालेलकर यांच्याकडून कालेलकर यांच्या जाणता अजाणता या नाटकात महाजनी यांनी पहिली संधी मिळाली. त्यानंतर शांताराम बापूंनी त्यांना झुंज या सिनेमात काम दिलं. त्यांचा हा सिनेमा प्रचंड गाजला. मराठीसोबत त्यांनी हिंदीमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली. देऊळबंद, पानीपत, कॅरी ऑन मराठा, मुंबईचा फौजदार, गोंधळात गोंधळ, देवता, यासांरख्या अनेक चित्रपटात त्यांनी काम केलं.