दिल्ली उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूत याच्या वडिलांना धक्का दिला आहे. 'न्याय : द जस्टिस' या चित्रपटाविरोधात कडक कारवाई करण्याऐवजी हायकोर्टाने सुशांतचे वडील केके सिंह यांना चित्रपटाच्या निर्मात्यांशी चर्चेद्वारे हे प्रकरण मिटवण्यास सांगितले आहे.
सुशांतच्या वडिलांच्या या चित्रपटावर बंदी घालण्याच्या याचिकेवरवर कोणतीही कारवाई करण्यास नकार देऊन हायकोर्टाने सुशांतच्या लाखो चाहत्यांची मने मोडली आहेत. दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाचे अध्यक्ष असलेले न्यायमूर्ती राजीव म्हणाले की, ही बाब कोर्टाबाहेरच्या चर्चेतून देखील सुटू शकते. कोर्टाचा हा प्रस्ताव दोन्ही बाजूंच्या वकिलांनी मान्य केला. आता चर्चेच्या माध्यमातून सुशांतच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, ते या चित्रपटाची कहाणी बदलतील किंवा यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
मागील सुनावणीत दिल्ली हायकोर्टाने सुशांत सिंह राजपूत याच्या जीवनावर आधारित 'न्याय: द जस्टिस' हा चित्रपट पूर्व नियोजित तारखेनुसार 11 जून रोजी प्रदर्शित झाला आहे की, नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेत्याच्या वडिलांनी यासंदर्भात परस्पर विरोधी विधाने केली होती. न्यायाधीशांनी सुशांतच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनावर किंवा चित्रपटातील त्याचे नाव किंवा तत्सम कुठलीही भूमिका दाखवण्यावर रोख लावण्यास मनाई केली होती. यानंतर राजपूतचे वडील कृष्णा किशोर सिंह यांनी या निर्णयाला आव्हान देत अपील दाखल केले होते.