अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अनेक दिवसांपासून चौकशी सुरु आहे. जॅकलिन फर्नांडिस शनिवारी पटियाला हाऊस कोर्टात हजर झाली होती. त्यानंतर तिला दिलासा देत न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत अटकेला स्थगिती दिली आहे. यासबंधी पुढील सुनावणी 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे. परंतु सुकेश चंद्रशेखर यांनी कोठडीतून पत्र लिहून प्रकरणाला नवे वळण दिले आहे.
काय लिहले आहे सुकेशने पत्रात?
200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात जॅकलिनचा संबंध नाही. जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि त्यातूनच महागड्या गिफ्ट्स आणि कारसह सर्व व्यवहार झाले. परंतु, 200 कोटींच्या फसवणुकीत तिचा कोणताही संबंध नाही.
"जॅकलीनने फक्त प्रेमाची मागणी केली होती. मी तिला आणि तिच्या कुटुंबाला भेटवस्तू दिल्या होत्या. यात जॅकलिनचा दोष काय? तिला माझ्याकडून प्रेम आणि तिच्या पाठीशी उभे राहण्याशिवाय कशाचीच अपेक्षा नव्हती. तिच्यावर आणि तिच्या कुटुंबासाठी जे काही पैसे खर्च झाले आहेत ते सर्व पैसे कायदेशीर मार्गाने कमावले होते. लवकरच हे ट्रायल कोर्टातही सिद्ध होईल" असे पत्र आपल्या वकिलाला सुकेशने लिहले आहे.