बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खानला ईडीकडून नोटीस बजावल्याच्या वृत्ताने खळबळ माजली होती. गुंतवणूकदार आणि बँकांना ३० कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपच्या घोटाळ्यामध्ये तिचे नाव आल्याचे समजत होते. परंतु, हे वृत्त खोटे असल्याचे समोर आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने हे वृत्त फेटाळून लावले आहे.
गौरी खान ही एक प्रसिद्ध सेलिब्रिटी इंटिरियर डिझायनर आहे. ती शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रॉडक्शन हाऊसशीही संबंधित आहे. वृत्तांनुसार गौरीला नोटीस बजावण्यासाठी ईडी कार्यालयाकडून परवानगी घेण्याची तयारी सुरू आहे. याप्रकरणी गौरीची चौकशी होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, ईडीने गौरीविरोधात कोणतीही नोटीस पाठवली नसल्याचे म्हंटले आहे. ही बातमी पूर्णपणे चुकीचे असून गौरींवर कारवाई करण्याची कोणतीही तयारी केली जात नाही, असेही ईडीने स्पष्ट केले आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईतील रहिवासी किरीट जसवंत शाह यांचा तुलसियानी ग्रुपच्या सुशांत गोल्फ सिटी प्रकल्पात 2015 मध्ये फ्लॅट घेतला होता. परंतु बिल्डरने त्यांना ना ताबा दिला आहे, ना त्यांनी दिलेली 85 लाखांची रक्कम परत केली आहे. त्यामुळे जसवंत शहा यांनी तुलसियानी समूहाचे संचालक अनिल कुमार तुलसियानी, महेश तुलसियानी यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकल्पाची जाहिरात गौरी खानने केली होती. गुन्हा दाखल करणाऱ्या व्यक्तीने गौरीच्या नावावर विश्वास ठेवून या प्रकल्पात पैसे गुंतवल्याचे सांगितले होते. त्यांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात गौरीचेही नाव असल्याचे बोलले जात होते.