मुंबई | गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे चित्रपट सृष्टीला मोठा फटका बसला होता. परंतु आता एक वर्षानंतर सर्व गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. चित्रपटगृह देखील 100 टक्के उपस्थितीत सुरू कऱण्याची परवानगी सरकारने दिली आहे. पण कोरोनाचं सावट असल्यामुळे चित्रपटगृहात फार कमी उपस्थिती असते. त्यामुळे मोठ्या बजेटचे चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल होत नाहीत. नवीन चित्रपट प्रदर्शित होत नसल्याने चित्रपटगृह चालक चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी एक पाऊल टाकलं आहे.
सर्वसामान्य प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचून आणण्याची क्षमता असलेल्या लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडेचा आगामी 'सरसेनापती हंबीरराव' या बहुप्रतीक्षित चित्रपटातील महत्वपूर्ण व्यक्तिरेखा कोण साकारणार हे समोर आले. हा भव्य, ऐतिहासिक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'सरसेनापती हंबीरराव' मध्ये कोणते कलाकार, कोणती ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसले. शिवजयंतीच्या मुहूर्तावर यातील एका महत्वपूर्ण व्यक्तिरेखेचा उलगडा झाला. अभिनेता गश्मीर महाजनी 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे आज स्पष्ट झाले.
उर्वीता प्रॉडक्शन्स निर्मित, शेखर मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाष बोरा यांची निर्मिती असलेल्या 'सरसेनापती हंबीरराव' या भव्य चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार याचा उलगडा झाला आहे, पण आता सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका कोण साकारणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.