सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे (Pravin Tarade) यांच्या आगामी बहुचर्चित 'सरसेनापती हंबीरराव' (Sarsenapati Hambirrao) हा भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपट (Historical Movie) कधी प्रदर्शित होणार याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली होती. जगभरातील शिवप्रेमी या ऐतिहासिक मराठी चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे, 27 मे 2022 रोजी 'सरसेनापती हंबीरराव' हा बिगबजेट चित्रपट (Big-Budget movie) प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून मे महिन्याच्या सुट्टीत दमदार संवाद, जबरदस्त ऍक्शनची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटाचा रक्त उसळवणारा टीझर प्रदर्शित (Trailer Release) झाला होता. त्याला जगभरातील प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातील संवाद आणि जबरदस्त ऍक्शन सिक्वेन्समुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत उत्कंठा वाढली होती. या चित्रपटात मराठीतील 'हँडसम हंक' अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वतः प्रविण तरडे साकारत आहेत. याशिवाय अनेक दिग्गज कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
संदीप मोहितेपाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्स निर्मित आणि शेखर मोहितेपाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेल्या 'सरसेनापती हंबीरराव' हा भव्य, ऐतिहासिक मराठी चित्रपट येत्या 27 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे.