मनोरंजन

Prashant Damle: 'कोण होणार हिटलर?' या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे मिळाले "क्युट" उत्तर!

Published by : Team Lokshahi

१ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे तर निर्मिती मधुगंधा कुलकर्णी आणि श्री भरत शितोळे यांची 'कोण होणार हिटलर?' या उभ्या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. 'मु. पो. बोंबीलवाडी' या १ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतीक्षित चित्रपटात हिटलर भूमिकेत आहेत. ज्येष्ठ व लोकप्रिय रंगकर्मी श्री प्रशांत दामले तीन लागोपाठच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या परेश मोकाशी यांचा हा चित्रपट असल्याने रसिकांमध्ये जी उत्कंठा लागून राहिली आहे, ती हिटलरच्या भूमिकेत प्रशांत दामले असल्याचे जाहीर झाल्याने आता दुपटीने वाढली आहे.

हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, वाळवी या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारांच्या हॅट्रिकनंतर मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी घेऊन येत असलेल्या "मु.पो. बोंबिलवाडी"मधील हिटलरच्या भूमिकेमध्ये कोण आहे, हा लाखमोलाचा प्रश्न रसिकांना पडला होता. हिटलरचा शोध घेण्यासाठी खरे तर प्रेक्षकांचा कल घेण्यात आला आणि त्याला भरघोष  प्रतिसाद मिळाला. त्याशिवाय वैभव मांगले, प्रणव रावराणे, मनमीत पेम, सुनील अभ्यंकर, गीतांजली कुलकर्णी, रितिका श्रोत्री, अद्वैत दादरकर यांचीही नावे या स्पर्धेत पुढे होती. मात्र अंतिमतः शिक्कामोर्तब झाले ते, प्रशांत दामले यांच्या नावावर.

'कोण होणार हिटलर?' या प्रश्नावरील पडदा लेखक, दिग्दर्शक परेश मोकाशी, निर्माते मधुगंधा कुलकर्णी आणि विवेक फिल्मस्, मयसभा करमणूक मंडळी यांनी बुधवारी हॉटेल ऑर्किड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उघडला आहे. चित्रपटाचे लेखन -दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे आहे. हिटलरच्या भूमिकेबद्दल विचारले असता प्रशांत दामले म्हणाले, "मुळात हिटलर म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एक आकृती येते, प्रकृती येते. मी माझ्या आयुष्यात असला हिटलर केला नाही आणि करणारही नाही. हे जे पात्र आहे त्याला हिटलर का म्हणावे हा प्रश्न पडावा असे हे पात्र आहे. ते करायला मिळावे आणि परेश व मधुगंधाबरोबर करायला मिळावे हे महत्वाचे. परेशबरोबर मी पहिल्यांदाच काम करत आहे. दिग्दर्शक कसा असावा तर तो असा असावा. तो एक अप्रतिम दिग्दर्शक आहे."

आजच्या मराठी चित्रपटांबद्दल विचारल्यावर दामले म्हणाले, "मराठी चित्रपटांबद्दल काही मला फार गती नाही, नाटकांबद्दल विचारले तर मी सांगू शकेन. मी फार कमी चित्रपट केले आहेत. दिग्दर्शक सांगेल तसे काम करणे ही माझी प्रकृती आणि वृत्ती आहे. कोरी पाटी घेवून बसले की काम करायला सोपे जाते. यात वैभव मांगले आहे, माझा लाडका दिग्दर्शक अद्वैत परळकर या चित्रपटात अभिनय करतो आहे, त्यामुळे एक वेगळा आनंद हा चित्रपट करताना मिळतो आहे. नाटकातील सर्व मंडळी असल्याने नाटकाचेच चित्रीकरण करतोय की काय असा काय असा भास होतोय मला."

चित्रपटाच्या निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, "आम्ही आत्तापर्यंत जेवढे चित्रपट केले त्यानिमित्ताने जेव्हा आम्ही लोकांना प्रीमियर किंवा इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने भेटायचो तेव्हा लोक परेशला आवर्जून सांगायचे की, तुम्ही 'बंबीलवाडी' नाटक परत आणा. माझेही हे आवडते नाटक आहे, कारण ती एक लाफ्टर राईड आहे. हळूहळू आम्ही जेव्हा याबाबत विचार करायला लागलो तेव्हा आम्हाला असे वाटायला लागले की, या नाटकावर चित्रपट का आणू नये? मग आम्ही ठरवले की या संकल्पनेचे चित्रपटीकरण करून त्याचा चित्रपट करायचा. त्यात आनंदाची बाब म्हणजे प्रशांत दामले यांनी हिटलरचे काम करायला हो म्हटल्यामुळे चित्रपटाचे मूल्य वाढले आहे. चित्रपट आपोआपच मोठा झाला. त्यांनी अप्रतिम काम केले आहे. यात प्रशांत दामले यांच्याबरोबरच वैभव मांगले, प्रणव रावराणे, मनमीत पेम, सुनील अभ्यंकर, गीतांजली कुलकर्णी, रितिका श्रोत्री, अद्वैत दादरकर हे कसलेले कलाकार आहेत, त्यामुळे एक चांगली भट्टी जमून आली आहे. त्यांचे अभिनय उत्तम झाले आहेत. ही एक धमाल लाफ्टर राईड झाली आहे."

हिटलरच्या निवडीबाबत बोलताना लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले, "आमचा हिटलर कसा असावा याबाबत चर्चा सुरु होती. हिटलर म्हणजे क्रूर, जगज्जेता, कठोर अशी त्याची प्रतिमा आहे. पण नाटकाचा फार्सिकल बाज पाहता, आमचा हिटलर 'क्युट' असावा अशी एक टूम निघाली. आता क्युट हिटलर कोण, असा प्रश्न आल्यावर महाराष्ट्रात क्युट म्हणून ज्याची ओळख आहे, असे एकाच नाव पुढे आले आणि ते म्हणजे प्रशांत दामले. नाटकामधून या कथेचे चित्रपटात रुपांतर होताना जे बदल झाले, मग त्यात वयोगट आला, आज त्या भूमिकेसाठी कोण योग्य आहे, याबद्दल चर्चा झाली. त्यातून मग कलाकारांची निवड झाली आणि ती चपखल आहे. त्यातून ही कलाकर मंडळी त्या त्या पात्रांमध्ये अगदी फिट्ट बसली आहेत, आणि ते तुम्ही पहालच." प्रशांत दामले यांनी हिटलर कसा दिला आहे, असे तुम्हाला वाटते, असे विचारले असता, मोकाशी म्हणाले, "हा प्रश्न मला खरेतर खऱ्या हिटलर विचारावासा वाटतो, की 'काय रे तुझे जमले आहे का? तुला असे वगायाला जमेल का आयुष्यात."

चित्रपटाचे निर्माते विवेक फिल्म्सचे श्री भरत शितोळे म्हणाले, "फिल्म निर्मिती क्षेत्रात आलो आणि ठरवले की मराठी व हिंदी चित्रपट करायचे. पण नेमका कोणता चित्रपट करायचा वगैरे विचारात असताना परेशजी आणि मधुगंधाजींनी 'मु. पो. बोंबीलवाडी' चा विषय सांगितला. कथा ऐकताचक्षणी मला वाटले की, विवेक फिल्म्सनी या चित्रपटानेच सुरुवात करायला हवी. त्यानिमित्ताने विवेक फिल्म्स आणि मयसभा एकत्र आलो. आम्हाला परेश मोकाशी व मधुगंधाजी यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता.

बरेच काही शिकता आले त्यांच्याकडून परेशजी हिटलरच्या भूमिकेमध्ये प्रशांत दामलेजीसाठी आग्रही होते. प्रशांत दामलेजी जेव्हा त्या गेटअप मध्ये आले तेव्हा वाटले की, परेशजींची व्हिजन बरोबर आहे. इतका परिपूर्ण आणि क्युट हिटलर दुसरा असूच शकत नाही. आम्ही यापुढेही एकत्र काम करत राहू."हा चित्रपट प्रेक्षकांनी का पहावा, असा प्रश्न विचारला असता मोकाशी यांनी मिश्कील उत्तर दिले आहे. "आजकाल व्यायाम नीट होत नाही, त्यामुळे फुप्फुसानाही व्यायाम होत नाही. 'मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी' एवढा हसवतो की त्यामुळे फुप्फुसांना खूप व्यायाम होतो. हे चित्रपट पाहण्याचे आरोग्यदायी कारण आहे."

Breaking NEWS | New Justice Statue In Supreme Court | न्याय देवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढली...

Diwali 2024: दिवाळीत लक्ष्मीपूजनसाठी देवी समोर लावा पणतीपासून तयार केलेली सुंदर समई...

मोठी बातमी: न्याय देवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढली

Amit Shah to CM Shinde | मुख्यमंत्रीपद देताना त्याग केला आता... जागावाटप बैठकीत शाहांचं मोठं वक्तव्य

दिल्लीत भाजपच्या निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक