छत्रपती संभाजीनगर | आर. बाल्की आणि अनुभव सिन्हा यांच्यासह आणखी काही बोटांवर मोजण्याइतके दिग्दर्शक ज्यांनी संवेदनशीलता जपत समाजाला संदेश देणारे चित्रपट बनवले आहेत. या प्रकारचे चित्रपट बनविणाऱ्या दिग्दर्शकांसमवेत प्रेक्षक किती काळ आणि कधीपर्यंत सोबत असतील यावर भारतीय सिनेमाचे भविष्य ठरेल, असे प्रतिपादन गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांनी यावेळी केले. जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज एमजीएम विद्यापीठाच्या रूक्मीणी सभागृहात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी, गीतकार जावेद अख्तर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिध्द दिग्दर्शक आर. बाल्की आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. गीतकार जावेद अख्तर पुढे म्हणाले की, अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला मनापासून शुभेच्छा देतो. या भागातील नागरिक कलेचा सन्मान करणारे आहेत. मी 20 वर्षाचा असताना मुंबईला आलो. त्यावेळी मी मराठी नाटके पाहिली, अशी कला मी कधीही पाहिली नव्हती. तेव्हापासून मी महाराष्ट्रात राहत असून दिवसेंदिवस माझे डोळे उघडत गेले. महाराष्ट्रात कलेचा सन्मान केला जातो. विशेषत: साहित्य, कला, कविता, नाटक, चित्रपट, नृत्य, संगीताबद्दल या भागातील सामान्य नागरिक विचार करतो. त्याला सन्मानित करतो, ही खूप आशादायी बाब आहे.
समकालीन काळात चित्रपट बनवणाऱ्यापेक्षा चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची भूमिका महत्वपूर्ण असून कोणत्या प्रकारचे चित्रपट बनतील आणि कोणत्या प्रकारचे चित्रपट बनणार नाहीत; याची जबाबदारी लोकांवर आहे. त्याचप्रमाणे आजच्या चित्रपटात मूल्य, नैतिकता आणि कोणत्या प्रकारचे संस्कार असतील हे सामान्य नागरिक ठरवतील असेही यावेळी अख्तर यांनी सांगितले.
दिग्दर्शक आर. बाल्की म्हणाले की, मी या शहरात पहिल्यांदा आलो आहे, इथे येऊन मी मनापासून आनंदी आहे. मला चित्रपट महोत्सव आवडतो. सर्वांनी अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आनंदाने साजरा करावा. महोत्सवाची उद्घाटन झाले असे त्यांनी यावेळी जाहीर केले.
चित्रपटाला या भागामध्ये गंभीरपणे घेतले जाते, असा हा भाग असून या भागामध्ये एमजीएम फिल्म इन्स्टिट्यूट निर्माण केल्याबद्दल मी संस्थेचे अभिनंदन करतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक चांगली संधी मिळालेली आहे. चित्रपट बनविण्यापेक्षा दुसरे कुठले मोठे काम नाही. विशेषत: चित्रपट क्षेत्रामध्ये काम करीत असताना खूप मानसन्मान मिळतो, असे दिग्दर्शक अनुभव सिन्हा म्हणाले.
अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा झाल्यानंतर आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे यावर्षीची जागतिक पातळीवरील नावाजलेली जर्मन भाषेतील फिल्म ‘फॉलन लिव्हस’ ही फेस्टिव्हलची ओपनिंग फिल्म म्हणून प्रदर्शित करण्यात आली. हा चित्रपट महोत्सव पुढील चार दिवस आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे. पद्मभूषण जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल प्रसिध्द गीतकार व पटकथाकार पद्मभूषण जावेद अख्तर यांना यावर्षीचा ‘पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.