फँड्री, सैराट,झुंड सारखे वेगळ्या प्रकारच्या चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या दिग्दर्शक(Director) नागराज पोपटराव मंजुळे (Nagraj Manjule) यांना लेखक, दिग्दर्शक, कवी यासोबतच अजून एक नवीन उपाधी मिळालेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागराज हे झुंड या चित्रपटामुळे नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. झुंड या चित्रपटाला चर्चेचे चांगलेच उधाण आले होते. त्यांना मिळालेली उपाधी ही आजवरची सर्वोच्च उपाधी म्हणता येईल. ते आता 'डॉक्टर' झाले असल्याने अनेकांची झोप उडाली आहे.
डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून नागराज यांना 'डॉक्टरेट' ही पदवी देण्यात आली. चित्रपटातील योगदानाबद्दल त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. नागराज यांचे मित्र हनुमंत लोखंडे यांनी याबाबत समाज माध्यमांना माहिती दिली. लोखंडे यांनी नागराज मंजुळे यांचे डॉक्टर पदवी स्वीकारतांनाचे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत.
पुणे विद्यापीठात M. phil (एम. फिल) आणि SET/NET परीक्षांची तयारी करताना त्या अंधारल्या दिवसांमध्ये चकरा मारतांनाचे तुम्ही आजही आठवतात. तेव्हा तुमचाही असाच सन्मान व्हावा, असे मला वाटायचे. ती इच्छा आज पूर्ण झाली. अशा शब्दांत लोखंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
नागराज मंजुळेंचे कौतुक करतांना यांनी चार्ली चॅप्लिन यांचे उदाहरण दिले. अपयश फारसे महत्वाचे नसते. स्वतः ला मूर्ख बनवण्यासाठी धैर्य लागते, असे उदाहरण त्यांनी दिले. तुम्ही अपयशाच्या झळा सोसत होता. पण संघर्षापुढे तुम्ही कधीच हार मानली नाही. तुम्ही इयत्ता दहावी सोडल्यापासून ते डी. लिटरेचरपर्यंतचा अविश्वसनीय, स्वप्नवत प्रवास आहे. अनेक प्रतिष्ठित चित्रपटांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांद्वारे सन्मानित झाल्यानंतर आता डी. वाय. पाटील विद्यापीठाद्वारे तुम्हाला डॉक्टर ऑफ लिटरेचर (D. Litterature) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे. याचा साक्षीदार होणे हा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे, असे गौरवोद्गार लोखंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.