अवघ्या जगाला कवेत घेणाऱ्या स्वप्नांना धुमारे फुटण्याचं वय म्हणजे तारुण्य! पण याहीपलीकडे जाऊन प्रेमासारख्या अवखळ भावनांची संवेदनशीलता अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवणारं वय म्हणजे तारुण्य. अगदी प्रत्येकाच्याच मनात कुठे ना कुठे एक अवखळ कोपरा असतोच. त्याच अवखळ कोपऱ्याला साद घालणारा नवा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, तो म्हणजे 'मन होते कधी उनाड!' प्रत्येकाच्याच मनातली ही अवखळ भावना या अल्बममधून अगदी अलगदपणे प्रेक्षकांच्या ह्रदयाचा ठाव घेते आणि मनाच्या त्याच अवखळ कोपऱ्यात जाऊन विसावते. आणि याला कारण म्हणजे या अल्बममधल्या गाण्यांना लाभलेला तनुजा मेहता यांचा चिरतरुण जादुई आवाज!
अनेक मोठमोठे पुरस्कार, नावाजलेल्या म्युझिक कंपन्यांसाठी आजवर गायिलेली गाणी आणि स्वत:च्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत सातत्याने पोहोचण्याची कला यामुळे तनुजा मेहता हे नाव आता सर्वपरिचित झालं आहे. त्यांच्या 'का कळेना' या अल्बमसाठी त्यांना २०१९च्या दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. २०२० सालात याच पुरस्कारासाठी त्यांना 'तेरी चाहत में' या अल्बममधील सुमधुर गाण्यांसाठी नामांकन मिळालं होतं. टी सीरिज, गोल्डमाईन टेलिफिल्म्स अशा नामांकित म्युझिक कंपन्यांसाठी तनुजा मेहता यांनी आजवर गाणी गायिली आहेत आणि प्रेक्षकांनी ती डोक्यावरही घेतली आहेत. याशिवाय तनुजा मेहतानी तब्बल ७ भारतीय भाषांमधून डबिंगही केलं आहे.
दिग्दर्शक रोहन सातघरे यांच्या अनोख्या शैलीचा मिडास टच या अल्बमसाठी लाभला आहे. सुप्रसिद्ध दिग्गज संगीतकार प्रविण कुवर, ज्यांनी अनेक हिट गाण्यांना संगीत दिलं आहे, त्यांनी मन उनाड या गाण्याचं संगीत केलं आहे. प्रेम कहाणी, गोंद्या मारतंय तंगडं, नशिबाची ऐशीतैशी, तीन बायका फजिती ऐका अशा ३५ मराठी चित्रपटांसाठी त्यांनी संगीत दिलं आहे. अंग्रेजी मे कहते है, स्कूल डेज अशा हिदी चित्रपटांमधील गाण्यांसोबतच कुंपणसारख्या टीव्ही सीरिजसाठीही त्यांनी संगीतकार म्हणून काम केलं आहे. कौतुक शिरोडकर यांनी लिहिलेली 'मन होत कधी उनाड' अल्बममधील गाणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल समीक्षा वव्हाळ हिच्यावर चित्रीत करण्यात आली आहेत. ओंकार मनवाल यांची कोरिओग्राफी तर आशिष पांडेंनी व्हिडीओग्राफी केलेल्या या गाण्यांचं संकलन स्वप्नील जाधव यांनी केलं आहे.