छोट्या पडद्यापासून क्रिकेटच्या मैदानापर्यंत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणा-या मंदिरा बेदीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या बुधवारी पहाटे मंदिराचा पती आणि निर्माता-दिग्दर्शक राज कौशल (Rraj Kkaushal) यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. पतीच्या आकस्मिक निधनाने मंदिरा बेदीला प्रचंड धक्का बसला आहे. पतीच्या अंत्ययात्रेत मंदिराची अवस्था बघवत नव्हती. आता पतीच्या निधनानंतर सहा दिवसांनी मंदिराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने राज यांच्यासोबतचे तीन फोटो शेअर केले आहेत. फोटोत दोघंही आनंदात दिसत आहेत. या पोस्टसोबत मंदिरानं काहीही लिहिलेलं नाही. शेअर केला तो केवळ एक इमोजी. आभाळाएवढं दु:ख तिनं फक्त या एका इमोजीतून व्यक्त केलं.
मंदिराची ही पोस्ट पाहिल्यानंतर तिच्या दु:खाची कल्पना आपण करू शकतो. अनेक सेलेब्रिटींनी मंदिराच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत तिला धीर दिला आहे. सायना नेहवाल, हरभजन सिंग, अमृता सुभाष, अधुना, मिथिला पालकर, अरमान मलिक या सेलेब्रिटींनी काही क्षणातच मंदिराच्या पोस्टला रिप्लाय केलेत. पतीच्या निधनानंतर मंदिरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही बदल केले आहेत. प्रोफाइल फोटो काढून तिने त्या जागी काळ्या रंगाचा फोटो ठेवला आहे.