संजय गडदे | मुंबई : 'प्लॅटून वन फिल्म्स'ने नुकतीच आपल्या नव्याकोऱ्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'तो, ती आणि फुजी' असं शीर्षक असणाऱ्या ह्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा मराठीतला प्रयोगशील दिग्दर्शक मोहित टाकळकर सांभाळणार आहे. भारत आणि जपानमध्ये घडणाऱ्या ह्या प्रेमकहाणीमध्ये ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत. ललित आणि मृण्मयीची लोकप्रिय जोडी ह्या आधी 'चि. व चि. सौ. का' ह्या चित्रपटात बघायला मिळाली होती. हा सिनेमा तब्बल १०० दिवस सिनेमागृहात गर्दी खेचत होता. 'ती, तो आणि फुजी' ह्या सिनेमाकडून देखील ह्याच अपेक्षा आहेत.
मराठी, हिंदी आणि उर्दू रंगभुमीवरचा ख्यातनाम दिग्दर्शक असलेल्या मोहितने जून २०२२ मध्ये 'मीडियम स्पायसी' ह्या चित्रपटाद्वारे आपलं मराठी दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. मोहित आपल्या 'तो, ती आणि फुजी' ह्या नव्या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलतांना, ह्याला प्रेमाच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांचा शोध घेणारा प्रवास म्हणतो. तो पुढे आणखी म्हणतो की, "सध्याच्या गुंतागुंतीच्या शहरी जीवनात सहज, सुंदर आणि नैसर्गिक प्रेमाची जागा मोजूनमापून केलेल्या कृत्रिम प्रेमाने घेतली आहे. पण खरा प्रश्न तर हा आहे, की नेमकं प्रेम गुंतागुंतीचं आहे की प्रेमात पडणारी माणसं?
चित्रपटाची कथा एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या दोन पात्रांभोवती फिरते. पात्रांच्या वैयक्तिक आशा आकांक्षा, त्यांची वेगवेगळी जीवनमुल्यं आणि एकमेकांकडून असलेल्या अवाजवी अपेक्षा ह्यांमुळे त्यांच्या नात्याचा कडवट शेवट होतो. पण पुन्हा सात वर्षांनी ही दोन पात्रं अनपेक्षितपणे एकमेकांसमोर येतात. त्यावेळी त्यांच्यासमोर असतात एकमेकांची वेगळ्या वाटेवरची आयुष्यं आणि त्यामुळे तयार झालेल्या नव्या अडचणी.
'झिम्मा' ह्या २०२१ मधल्या दुसऱ्या सर्वाधिक कमाई असणाऱ्या सिनेमाची लेखिका इरावती कर्णिकने ह्या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. 'आनंदी गोपाळ' ह्या सिनेमासाठी इरावतीला सर्वोकृष्ट लेखक आणि ललितला सर्वोत्तम अभिनेत्याचं (क्रिटिक्स चॉईस) मराठी फिल्म फेयर देखील मिळालं आहे. इरावतीला चित्रपटाची कथा शहरी प्रत्येक तरुण व्यक्तीला स्वत:चीच कथा वाटेल, ह्याची अपेक्षा आहे. इरावती म्हणते की, "आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आपल्याला मनापासून हवं असलेलं प्रेम निसटून गेलेलं असतं. आणि आपण सतत मागे बघून त्या प्रेमाच्या कडू-गोड आठवणींमध्ये रमत असतो. मला वाटतं की, हा चित्रपट बघून प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्या अपयशी ठरलेल्या पण उत्कट असणाऱ्या प्रेमाची आठवण उफाळून येईल."
शिलादित्य बोरा आणि राकेश वारे ही जोडी 'तो, ती आणि फुजी' या चित्रपटाची निर्मिती करीत असून, ह्या वर्षाअखेरीस चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. नेहमीच आशयप्रधान चित्रपटांची मांडणी करणाऱ्या शिलादित्य बोरा ह्यांची निर्मिती असलेल्या 'पिकासो' ह्या चित्रपटाला २०२०मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तसेच त्यांनी सोनी राझदान, पंकज त्रिपाठी आणि अहाना कुमरा ह्यांच्या भूमिका असलेल्या, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संजोय नाग ह्यांनी दिग्दर्शन केलेल्या 'युअर्स ट्रुली' ह्या सिनेमाचीही निर्मिती केली होती. 'युअर्स ट्रुली'चा प्रीमिअर २०१८ च्या 'बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात'झाला होता.
'तो, ती आणि फुजी'च्या निर्मितीसाठी त्यांना तेलगू अभिनेते आणि निर्माते असलेल्या राकेश वारे ह्यांची साथ मिळाली आहे. शिलादित्य म्हणतात, "२०१९ ला क्योटोमध्ये झालेल्या फिल्ममेकर्स लॅबमध्ये मी सहभागी झालेलो. त्यावेळी जपानी भाषेत शॉर्टफिल्म करतांना मला जपानाच्या सौंदर्याने भुरळ पाडली. मी त्याच वेळी ठरवलं की भविष्यात मी जपानमध्ये घडणारी कथा चित्रपटात मांडणार. आणि मोहितने एक अप्रतिम कथा रचून जणू माझं स्वप्नंच पूर्ण केलंय. शिलादित्य पुढे म्हणतात की "मी प्रादेशिक सिनेमांचा चाहता आहे. मागच्या काही वर्षांतल्या प्रादेशिक सिनेमांची कामगिरी बघता, त्यांनी बॉलीवुडलाही मागे सोडलंय असं आपण ठामपणे म्हणू शकतो. मला खात्री आहे की आमचा 'तो, ती आणि फुजी' हा आगळावेगळा रोमँटिक सिनेमा देखील देशविदेशातल्या तरुणाईला आपलासा वाटेल."
शिलादित्य ह्या वर्षी अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्ट्मध्ये व्यस्त आहेत. रेवती आणि सत्यजीत दुबे ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'ए जिंदगी' आणि सबा आझाद, नमित दास आणि रुमाना मोला ह्यांच्या भूमिका असलेला 'मिनिमम' ह्या चित्रपटांची निर्मिती ते करत आहेत. तसंच विनय पाठक आणि मासूमी माखिजा ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'भगवान भरोसे' ह्या चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शकीय पदार्पण देखील करणार आहेत.
'तो, ती आणि फुजी'चं चित्रिकरण पुणे, कोलाड, टोकियो, क्योटो आणि माउंट फुजी इथे होणार आहे. दोन विभिन्न संस्कृती असणाऱ्या देशांचं सौंदर्य टिपण्यासाठी, ह्या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी दोन वेगळे सिनेमॅटोग्राफर्स असणार आहेत.
चित्रपटाच्या कलाकार आणि तंत्रज्ञांबद्दल बोलतांना मोहित म्हणतो की, "तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणारे कलाकार आणि निर्माते मिळणं ही कठीण गोष्ट आहे. तुम्हाला हवी ती गोष्ट, तुम्हाला हवी तशी मांडू देणारे निर्माते पाठीशी आहेत, ह्याचा मला आनंद आहे. चित्रिकरणाला सुरुवात करून लवकरात लवकरात तो प्रेक्षाकांसमोर आणण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत." प्लॅटून वन फिल्म्स' आणि ‘क्रेझी अँट्स प्रॉडक्शन’ निर्मित, 'तो, ती आणि फुजी' हा चित्रपट १७ फेब्रुवारी २०२३ रोजी संपूर्ण देशभरातल्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.