बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांना धमकी देणाऱ्या प्रकरणात तपासादरम्यान एक मोठा खुलासा समोर आला आहे. सिद्धू मुसेवाला (Siddhu Musewala) आणि मकोका (Makoka) प्रकरणात अडकलेला आरोपी सौरव कांबळे उर्फ महाकाल (Mahakal) याच्या चौकशीदरम्यान बिश्नोई टोळीचा डोळा हा केवळ सलमान खानवरच नसून इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर (Karan Johar) याच्यावर देखील होता अशी माहिती मिळाली आहे. पुणे पोलिसांनी चौकशीदरम्यान महाकाल बद्दलचा हा खुलासा केला आहे. सलमान खान धमकी प्रकरणी सौरव उर्फ महाकाल याने पुणे पोलिसांच्या चौकशीदरम्यान दिलेल्या जबानीनुसार सलमान खान व्यतिरिक्त चित्रपट निर्माता करण जोहरचेही नाव बिश्नोई टोळीच्या बॉलिवूड हिटलिस्टमध्ये आहे.
सौरवने पुणे पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला करण जोहर प्रामुख्याने जबाबदार होता आणि त्यामुळेच त्याचाही बिश्नोई गँगच्या हिटलिस्टमध्ये समावेश झाला होता. याच कारणावरून चित्रपट निर्माते करण जोहरला धमकावून बिष्णोई टोळीने ५ कोटींची खंडणी वसूल करण्याची तयारी केली होती. चौकशीदरम्यान सौरवने असेही सांगितले आहे की सिग्नल अॅपद्वारे तो विक्रम ब्रारशी जोडला गेला होता आणि तो फक्त विक्रम ब्रारसाठी काम करत असे त्यामुळे त्याला बिश्नोई टोळीच्या अनेक हालचाली आणि लक्ष्यांची माहिती होती. सध्या पुणे पोलीस महाकाळ यांच्या वक्तव्यातील सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी सिद्धू मुसेवाला हत्याकांड आणि सलमान खानला धमकावणाऱ्या सौरव महाकालला अटक केली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाकाल हा प्रख्यात शूटर संतोष जाधवचा साथीदार आहे आणि गायक सिद्धू मुसेवाला या प्रकरणातील संशयित आहे.