हॉलिवुड पॉपुलर सिंगर जस्टीन बीबर (Justin Bieber) जगभरात प्रसिध्द आहे. सोबतच भारतातही त्याचे लाखो चाहते आहेत. त्याने आपल्या बेबी गाण्याने सर्वच प्रेक्षकांना वेड लावले आहे. तो जगातील प्रसिद्ध पॉप गायकांपैकी एक आहे. जस्टीन बीबर 5 वर्षानंतर भारतामध्ये आपल्या नवीन अल्बमच्या प्रमोशनसाठी येणार होता. पण सध्या जस्टिन बीबर हा गंभीर आजाराशी झुंज देतो आहे. त्यामुळे जस्टिन बीबरने काही दिवसांसाठी हा दौरा पुढे ढकळला आहे.
जस्टिन बीबरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. याबद्दलची माहिती जस्टिनने एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या आजाराबद्दलची माहिती दिली आहे. 28 वर्षीय जस्टिनच्या चेहऱ्याला पार्श्यल पॅरालिसिस झाला आहे. त्याला रामसे हंट सिंड्रोम (Ramsay Hunt syndrome) हा दुर्मीळ आजार झाल्याचं निदान झाल्याचं त्याने सांगितलं आहे.
या व्हिडीओच्या माध्यमातून जस्टिन आपल्या सध्याच्या स्थितीबद्दल बोलताना म्हणाला की, ‘तुम्ही पाहू शकता, मला माझे डोळेही मिचकवता येत नाही आहेत आणि माझ्या चेहऱ्याच्या एका बाजूने मी हसायला जमत नाही. माझा शो रद्द होण्यामागचे हेच कारण आहे. यामुळे माझा चाहतावर्ग निराश झाला आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, मी शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही. मला माझं शरीर थोडं आराम करायला सांगत आहे. मला आशा आहे की, तुम्ही मला समजून घ्याल.’
पुढे जस्टिन म्हणाला की, या आजारामधून मला कधी बरे वाटेल आणि किती वेळ लागेल याबद्दल मी काही सांगू नाही शकत. मला थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे. मी पूर्णपणे बरा होऊन पुन्हा सेटवर परत येण्याचा प्रयत्न करत आहे. असे जस्टिन बीबर या व्हिडिओमध्ये म्हणाला.