‘विजयी विश्व हुनर हमारा’चा नारा घेऊन आलेल्या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज गॉट टॅलेंट या रियालिटी शोमधील स्पर्धकांच्या नेत्रदीपक सादरीकरणांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांची प्रतिभा ही केवळ नेत्रसुखद नाही, तर मनोरंजन प्रदान करणारी देखील आहे. हा वीकएंड म्हणजे मनोरंजन आणि प्रतिभा यांचा धमाका असणार आहे. थक्क करून सोडणारे एरियल स्टंट ते जबरदस्त मलखांब स्टंट, अफलातून डान्स मूव्ह्जपासून मनमोहक सुरावटीपर्यंत सगळे काही या भागात बघायला मिळेल. आपल्या असामान्य ‘हुनर’चे उत्कृष्ट सादरीकरण करून देशातील हे ‘दुर्मिळ हिरे’ परीक्षकांना दिपवून टाकतील. शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि बादशाह या परीक्षकांसोबत या भागाला चार चाँद लावायला येणार आहे अष्टपैलू अभिनेता अनुपम खेर. तो अतिथी परीक्षक असेल.
सादर होणाऱ्या सर्व स्पर्धकांपैकी मुंबईच्या तरुण डान्सर्सचा ग्रुप ‘पवईज अनडिफीटेड’ आपली विशेष छाप उमटवत परीक्षकांना आपल्या नावीन्यपूर्ण डान्स टेकनिक आणि टायमिंगने चकित करेल. त्यांच्या सुंदर रचना आणि दमदार परफॉर्मन्स यांना भरभरून दाद मिळेल. इतकेच नाही, शिल्पा आणि बादशाह तर मंचावर जाऊन त्यांच्यासोबत ‘करंट लगा रे’ गाण्यावर डान्स देखील करताना दिसतील.
या ग्रूपने केलेली वाटचाल आणि त्यांचा दृढनिर्धार पाहून थक्क झालेला परीक्षक बादशाह त्यांना म्हणाला, “तुम डिफीट होने वाली चीज नहीं हो रिपीट होने वाली चीज हो”
त्याला पुस्ती जोडत परीक्षक शिल्पा शेट्टी म्हणाली, “तुम्हाला पाहून मला किंग्ज युनायटेड क्रूची आठवण झाली. हाच तर आहे, ‘विजयी विश्व हुनर हमारा’! आजचा परफॉर्मन्स बघितल्यानंतर मी हे खात्रीपूर्वक सांगू शकते की, तुम्ही माझ्या हृदयाचा ताबा घेतला आहे. आणि फक्त माझ्याच नाही, तर सर्वच प्रेक्षकांच्या हृदयात तुम्ही आपले स्थान बनवले असणार याची मला खात्री आहे. या मंचावर दीर्घ काळपर्यंत तुम्ही अनडिफीटेड राहाल असे मला वाटते.”