सलमान खान आणि अमृता फडणवीस यांच्या नंतर हिंदी चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांना मुंबई पोलिसांची सुरक्षा मिळाली आहे. अमिताभ बच्चन याना आधी सामान्य दर्जाची सुरक्षा होती. आता बच्चन यांना एक्स दर्जाची सुरक्षा सुरक्षा काही काळासाठी पुरवण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी अमिताभ यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. याशिवाय बॉलीवूडमधील स्टार अभिनेत्यांना सातत्यानं मिळणाऱ्या धमक्या यामुळे मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. अमिताभ हे बॉलीवूड विश्वातील मोठे सेलिब्रेटी असल्यामुळे त्यांची लोकप्रियता मोठी आहे. आणि त्यांच्या नावाभोवती असणारे वलय याचा विचार करुन हा निर्णय घेतला गेल्याची चर्चा आहे.
काय आहे एक्स दर्जाची सुरक्षा ?
प्रसिद्ध राजकीय नेते, कलाकार, उद्योजक आणि क्रीडापटू यांना सरकारकडून सुरक्षा दिली जाते. त्यांच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेऊन त्यांना कुठल्या दर्जाची सुरक्षा द्यायची, याचा निर्णय सरकारकडून घेतला जातो. एक्स, वाय, झेड आणि एसपीजी कमांडो असे सुरक्षेचे विविध प्रकार आहेत.
एखाद्या व्यक्तीला कोणत्याप्रकारची सुरक्षा पुरवली जावी याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालय घेतं. मात्र हा निर्णय घेताना गुप्तचर यंत्रणांकडून म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच ‘आयबी’ आणि रिसर्च अँड अनायलिसिस विंग म्हणजेच ‘रॉ’चा सल्ला घेतला जातो. एक्स कॅटेगरीतंर्गत फक्त दोन जण सुरक्षेसाठी दिले जातात. हे खूप सामान्य दर्जाचे सुरक्षाकवच आहे.