बॉलिवूड स्टार कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच आई-वडील होणार आहेत. ही गोड बातमी समोर आल्यानंतर आता हे कपल चर्चेत आले आहेत . दरम्यान, मंगळवारी दोघेही महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबत उज्जैनला पोहोचले. मात्र दोघांनाही दर्शन न करताच परतावे लागले. हिंदू संघटनांनी आलिया आणि रणबीर यांच्याविरोधात मंदिराबाहेर आंदोलन केलं. ज्यामुळे या दोघांनाही मंदिरात प्रवेश मिळाला नाही.
हिंदू संघटनांनी निषेध केला
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी महाकाल मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. या सर्व संघटना रणबीर कपूरच्या गोमांसावरील वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत होत्या.
आलियाने मंदिरात जाण्यास नकार दिला
काही वेळ घोषणाबाजी केल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना मंदिराबाहेर रोखून हुसकावून लावले. पण प्रेग्नेंसीमुळे आलियाला कोणताही धोका पत्करायचा नव्हता आणि तिने मंदिरात जाण्यास नकार दिला. यामुळे रणबीरही परतला. मात्र, अयान मुखर्जीने गर्भगृहात जाऊन भगवान महाकालची प्रार्थना केली.
व्हिडिओद्वारे माहिती दिली आहे
आलिया आणि रणबीर अयान मुखर्जीसोबत उज्जैनला रवाना झाले तेव्हा आलियाने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली होती. आलियाने कारमध्ये बसून एक व्हिडिओ बनवला ज्यामध्ये तिने सांगितले की ती महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनला जात आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हिंदू संघटना सक्रिय झाल्या आणि सेलिब्रिटींना विरोध केला.
का होतोय आलिया व रणबीरला विरोध
बीफ खाण्यावरून रणबीरने एक विधान केलं होतं. 2011 मध्ये ‘रॉकस्टार’ या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी तो यावर बोलला होता. माझं कुटुंब पेशावरचं आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबात पेशावरी खाद्यसंस्कृती आहे. मी मटण खातो. मी बीफचाही चाहता आहे, असं रणबीर म्हणाला होता. त्याचा हा जुना व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू संघटनांनी रणबीरला विरोध चालवला आहे. रणबीर आमच्या गोमातेविरोधात बोलला. त्यामुळे आम्ही त्याला विरोध करत आहोत, असं महाकाल मंदिराबाहेर आंदोलन करणारा एक कार्यकर्ता व्हिडीओत सांगताना दिसत आहे.