पंकज राणे | छत्रपती शिवाज महाराज आणि त्यांच्यासोबतचे शुरवीर योद्धा, मावळे यांच्या पराक्रमाचा इतिहास रुपेरी पडद्यावर पाहणं वेगळा अनुभव देणारं असतं. असाच अनुभव देतोय हर हर महादेव हा चित्रपट अभिजीत देशपांडे लिखित दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे छत्रपती महाराजांची भूमिका साकारतोय तर अभिनेता शरद केळकर बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत झळकतोय. अभिनेत्री अमृता खानविलकर ही बाजीप्रभूंच्या पत्नी सोनाबाईंचं पात्र करतेय तर महाराजांच्या पत्नी महाराणी सईबाईंच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री सायली संजीव. अशा महत्त्वाच्या भूमिका यात पाहायला मिळत आहे.
नुकताच आलेला पावनखिंड या चित्रपटाशी याचं कम्पेरिझन होऊ शकतं मात्र चित्रपट पाहिल्यानंतर ते होणार नाही. याचं कारण म्हणजे हा चित्रपट, याची कथा, सार त्या चित्रपटाहून वेगळा आहे. कथेचा काही भाग पावनखिंडचा इतिहास दर्शवतो पण तोही वेगळ्या ठंगाने. या चित्रपटात काय काय पाहायला मिळणार आहे ? तर छत्रपती होण्याआधीचे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांची भेट, त्यांची मैत्री, त्यांचं नातं, बाजीप्रभूंच कृतृत्त्व, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, अफजलखान वध आणि पावनखिंडीच्या इतिहासाच्या युद्धाचा थरार. या विविध गोष्टींचे दर्शन या चित्रपटात होतं.
शुरवीर योद्धा बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत शरद केळकरचं व्यक्तिमत्त् हुबेहुब बसतं. त्याची देहबोली, शरीरयष्ठी, लवचिकता त्या शुर योद्धाला साजेसा आहे. शरदच्या तोंडी बाजीप्रभूंच्या भूमिकेसाठी आलेले संवादही वजनदार आहेत. त्याने पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. मात्र कुठेतही शरदच्या तोंडून आलेले मराठी संवाद आणि त्यांचे उच्चार काही ठिकाणी खटकू शकतात.
अभिनेते सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहणं हा एक वेगळा प्रयोग जाणवतो. कारण सुबोध भावे यांना महाराजांच्या भूमिकेत पाहण्याचा विचारही कुणी केला नसेल. पण सुबोधने त्याच्या अभिनयाच्या जोरावर, देहबोलीतून, शैलीतून महाराज उत्तमरित्या साकारलेत. सुबोधच्या तोंडी असलेली महाराजांच्या भूमिकेतील संवादाला पुरेपुर न्याय मिळाला. ते संवाद अर्थपूर्ण पद्धतिने सादर केले.
बाजीप्रभूंच्या पत्नी सोनाबाईंच्या भूमिकेत अमृता झळकत असून तिनेही न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. महाराणी सईबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री सायली संजीव विशेष लक्ष वेधते. अभिनेता हार्दिक जोशीने महाराजांचा साथीदार आबाजी विश्वनाथ साकारलाय. त्यानेही उत्तम काम केलय. फुलाजीप्रभूंच्या भूमिकेत अशोक शिंदे, तावजीच्या भूमिकेत किशोर कदम, जिजामातांच्या भूमिकेत निशीगंधा वाड, धनाजीच्या भूमिकेत नितीश चव्हाण, शरद पोंक्षे या कलाकारांचही चांगलं काम झाल.
तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट उजवा ठरला. हितेश मोडकचं संगीत आणि गाणी या चित्रपटाची जमेची बाजू आहे. चित्रपटाचं संकलन, छायांकनही उत्तम झालय. चित्रपटाच्या उत्तरार्धातील युद्धाचे सीन प्रभावी वाटतात. स्लो मोशन, विविध इफेक्ट्स, वाईड लाँग शॉट्स लक्ष वेधून घेतात. त्यामुळे हा चित्रपट जबरदस्त व्हीज्यूअल अनुभव देत इतिहातासातील महत्त्वाच्या घडामोडींचं दर्शन घडवतो.
सिनेमा : हर हर महादेव
निर्मिती : झी स्टुडिओज, सुनील फडतरे
लेखन, दिग्दर्शन : अभिजीत देशपांडे
कलाकार : शरद केळकर, सुबोध भावे, निशिगंधा वाड, अमृता खानविलकर, हार्दिक जोशी
छायांकन : त्रिभुवन सदिनेनी
संगीत : हितेश मोडक
दर्जा : 3 स्टार