मालिका विश्वातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्या अनेक मालिका गाजल्या.अवघाची संसार,वादळवाट,होणार सून मी या घरची,फुलपाखरू, या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या.मंदार देवस्थळी पुन्हा एकदा प्रेमकथा घेऊन प्रेक्षकांच्या समोर येत आहेत.
या मालिकेबद्दल बोलताना मंदार देवस्थळी म्हणाले, "एक वेगळी आणि अतिशय रंजक प्रेमकहाणी आम्ही मन उडू उडू झालं या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहोत. प्रेक्षकांचे अत्यंत लाडके कलाकार या मालिकेत त्यांना दिसणार आहेत. तसेच एक गोड आणि फ्रेश लव्हस्टोरी त्यांना पाहायला मिळेल जी पाहताना त्या व्यक्तिरेखांसोबत सर्व प्रेक्षक रिलेट करू शकतील. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर देखील प्रेक्षक भरभरून प्रेम करतील अशी मी आशा करतो."
झी मराठीवरील आगामी मालिका 'मन उडु उडु झालं' या मालिकेचं ते दिग्दर्शन करणार आहेत. नुकतंच या मालिकेच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला. ३० ऑगस्टपासून संध्याकाळी ७.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अजिंक्य राऊत आणि हृता दुर्गुळे यांच्या या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.